पत्रा चाळ गैरव्यवहाराप्रकरणी साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचा जबाब सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नोंदवला. याप्रकरणी पाटकर यांना समन्स बजावून ईडीने मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते.

समन्स बजावल्यानंतर पाटकर दुपारी तीनच्या सुमारास ईडी कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्या ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या. त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. दरम्यान, ईडीने पाटकर यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – भाडेवाढ द्या, अन्यथा १५ सप्टेंबरपासून बेमुदत संप ; मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा संपाचा इशारा

प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून २०१० मध्ये गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले आहे. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर येथे सदनिका खरेदीसाठी वापरली, असा आरोप आहे. याशिवाय अलिबाग येथील किहीम समुद्रकिनारी ८ भूखंड देखील संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आले. रोख रक्कम देऊन ही खरेदी करण्यात आली होती. स्वप्ना पाटकर यांना धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्य़ात आला होता.