मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुनर्वसित इमारती सुरक्षित, मजबूत असल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिला आहे. तर उच्च न्यायालयाने नुकताच रहिवाशांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश म्हाडाच्या मुंबई मंडळाला दिले आहेत. त्यानुसार मुंबई मंडळाने पत्राचाळीतील घरांचा ताबा देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, घराचा ताबा घेण्यासंबंधीचे आवाहन मंडळाने रहिवाशांना केले आहे.
पत्राचाळ पुनर्विकासाअतंर्गत अर्धवट स्थितीत असलेल्या पुनर्वसित इमारतींचे बांधकाम मुंबई मंडळाने पूर्ण केले. काम पूर्ण झाल्यानंतर ६७२ घरांचा समावेश असलेल्या इमारतींना निवासी दाखाला प्राप्त करून घेण्यात आला. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडळाने गेल्या वर्षी घरांसाठी सोडतही काढली. निवासी दाखला मिळाल्यानंतर सोडत पार पडून एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप एकाही रहिवाशाने घराचा ताबा घेतलेला नाही. ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालायने दिले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मंडळाने ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली.
मात्र एकाही रहिवाशाने ताबा घेतलेला नाही. त्यामुळे मंडळाने यासंबंधी पुन्हा न्यायालयाकडे विचारणा केली होती. त्यानुसार नुकतीच न्यायालयाने पुन्हा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरूवता करण्याचे निर्देश मुंबई मंडळाला दिले. त्यानुसार मंडळाने दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रात जाहीर निविदेन प्रसिद्ध करून ताबा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच रहिवाशांनी ताबा घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, पुनर्वसित इमारतींचे काम योग्य आणि सुरक्षित नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला होता. इमारतीच्या प्लास्टरचा काही भागही कोसळला होता. त्यानंतर मंडळाने व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांकडून सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी करून घेतली होती. या तपासणी अहवालानुसार सर्व इमारती मजबूत आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. या अहवालाच्या आणि ताबा प्रक्रिया सुरू करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे घरे तयार असताना, निवासी दाखला प्राप्त असताना घरांचा ताबा घेतला जात नसल्याने मंडळाला आजही रहिवाशांना घरभाडे द्यावे लागत आहे. आर्थिक भार सोसावा लागत आहे. तेव्हा आता रहिवाशांनी घरांचा ताबा घेतला नाही तर घरभाडे बंद करण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही मंडळाने दिला आहे.
