आयुक्तांच्या बंदीनंतरही रस्ते विभागाकडून दहिसरमध्ये २२ रस्त्यांवर पेव्हरब्लॉकची कामे

काम केल्यानंतरही अवघ्या काही दिवसांतच रस्ते ओबडधोबड करण्याबरोबरच अपघाताला निमंत्रण देणारे पेव्हरब्लॉक यापुढे न बसवण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले असतानाही, या ‘पेव्हरब्लॉक’चा रस्ते विभागाला असलेला सोस कमी होण्याची चिन्हे नाहीत. दहिसरमधील २२ रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसवण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. हे रस्ते अरुंद असल्याने तेथे ‘रोडरोलर’ वापरता येणार नाही, अशी सबब सांगून आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवण्यात आले आहेत.

मुंबईमधील मोठे चौक (जंक्शन), रस्ते आणि पदपथांवर पेव्हरब्लॉक बसविण्याचा सपाटा पालिकेने लावला होता. काही ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये पेव्हरब्लॉक बसवून ते बुजविण्याचा अयशस्वी प्रयत्नही पालिकेने केला.  परंतु पेव्हरब्लॉक उखडून खड्डय़ांना आयते आमंत्रण मिळत होते. पदपथांवर योग्य पद्धतीने पेव्हरब्लॉक बसविण्यात न आल्यामुळे ते अल्पावधीतच निघू लागले. अनेक पादचाऱ्यांना त्याचा फटका बसू लागला होता. रस्ता समांतर न करताच त्यावर पेव्हरब्लॉक लावल्यामुळे ते खिळखिळीत होऊ लागले आणि वाहतुकीवरही त्याचा परिणाम होऊ लागला होता. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे पेव्हरब्लॉकचा तुकडा उडून पादचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटनाही मुंबईत अनेक ठिकाणी घडल्या. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसविण्यास बंदी आदेश जारी केले. टप्प्याटप्प्याने मुंबईतील मुख्य चौकांमध्ये बसविलेले पेव्हरब्लॉक काढून त्याजागी डांबरीकरण करण्याची घोषणाही आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी केली.

परंतु आयुक्तांच्या या आदेशांना पालिकेच्या रस्ते विभागाने हरताळ फासला आहे. रस्ते विभागाने दहिसरमधील तब्बल २२ रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी ही कामे सुरूही करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी मिळून या २२ रस्त्यांची कामे तात्काळ बंद करण्यास भाग पाडले, मात्र या प्रकरणाने पालिका अधिकाऱ्यांचे ‘पेव्हर’वरील प्रेम पुन्हा उजेडात आले आहे.

मुंबईमधील २० फुटांपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसविण्यात येणार असल्याचे रस्ते विभागातील अधिकारी सांगतात. अरुंद रस्त्यांवर रोडरोलरच्या साह्य़ाने सपाटीकरण करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही रस्त्यांवर रोडरोलर जाऊच शकत नाही, त्यामुळे या रस्त्यांवर पेव्हरब्लॉक बसविण्यात येत आहेत, असे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘आधी रस्ते नव्हते का?’

पेव्हरब्लॉकला ठामपणे विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही एक गट आहे. या गटाने रस्ते विभागाचा दावा खोडून काढला आहे. ‘पूर्वी मुंबईमधील अरुंद रस्ते डांबरी होते. त्या वेळी या डांबरी रस्त्यांचे सपाटीकरण कशा पद्धतीने करण्यात आले होते,’ असा सवाल पालिकेतील एका अधिकाऱ्याने केला. ‘पेव्हरब्लॉक योग्य पद्धतीने बसविण्यात येत नाहीत आणि त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. ते बुजविल्यानंतरही रस्ता ओबडधोबड होतो. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. डांबरी रस्त्यावर खड्डा पडला तर डांबरमिश्रित खडी भरून तो बुजविता येतो,’ याकडेही या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.