मुंबई : मागील दीड वर्षांपासून पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीची प्रक्रिया विविध कारणांनी पुढे ढकलली जात आहे. भरतीची जाहिरात आणि शाळा निवडीसाठीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने पात्र असलेल्या सुमारे १ लाख ७० हजार शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राज्य परीक्षा परिषदेकडूनही याबाबत ठोस भूमिका स्पष्ट केली जात नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत शिक्षक व संघटनांकडून वारंवार विचारणा केली जात असताना, शिक्षण विभागाकडून प्रत्येक वेळी काही दिवसांमध्ये प्रक्रिया सुरू होईल, असे उत्तर दिले जाते आहे. मात्र, प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होण्याची आणि प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन भरतीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी केली. पवित्र पोर्टलवर शाळा निवडीसाठीचा प्राधान्यक्रम त्वरित सुरू करण्यात यावा, जेणेकरून पुढील नियुक्ती प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात येत आहे.
रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. एका बाजूला शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शाळा अडचणीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पात्र शिक्षकांची भरती प्रशासकीय विलंबामुळे रखडली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची जाहिरात आणि प्राधान्यक्रम प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी शिवयुनिटी फाउंडेशनच्या बालुशा माने यांनी केली आहे.
तरुणांचे भवितव्य धोक्यात
उमेदवारांच्या मते, भरती प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हजारो तरुणांचे करिअर अडचणीत आले असून, आर्थिक आणि मानसिक ताणही वाढत आहेत. त्यामुळे आणखी विलंब न करता शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून प्राधान्यक्रम प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या संदर्भात शिक्षक संघटनांकडून प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले आहे.
