मुंबई : ‘पवित्र पोर्टल’मार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका / नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन, तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीसाठी राबविण्यात आली असून या भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय विविध व्यवस्थापनांमधील एकूण १३,११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम व गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने राबविण्यात येत असून निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनवर निवडीची स्थिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संबंधित उमेदवारांना ‘एसएमएस’द्वारेही माहिती कळविण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने सांगितले. शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या शिफारस यादीमध्ये व्यवस्थापनिहाय शिफारस केलेल्या पदांमध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ८ हजार ४८१ जागा आहेत.

त्याखालोखाल १ हजार ६०१ आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा, १ हजार ४५१ खाजगी शैक्षणिक संस्था, १ हजार ३०६ महानगरपालिका, २२६ नगरपालिका / परिषदा, ५४ शासकीय विद्यानिकेतन यांचा समावेश आहे. तसेच पद प्रकारनिहाय शिफारस झालेली पदसंख्येमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी ७ हजार ५४१, इयत्ता सहावी ते आठवी ४ हजार २०७, इयत्ता नववी ते दहावी १ हजार ११९, इयत्ता अकरावी ते बारावी २५२ अशा एकूण १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित प्रक्रियेतून निवड झालेल्या या उमेदवारांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची जडणघडण करण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करावे. राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी नव्याने निवड झालेल्या शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व्यक्त केला.