मुंबई: मुंबईतील पायधुनी भागात बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. २५ एप्रिलच्या रात्री पायधुनी मधील अब्दुल्ला दोकाफिया यांच्या कुटुंबाने आपल्या नातेवाईकांसोबत बिर्याणी खाल्ली होती.

नातेवाईक गेल्यानंतर रात्री उशिरा सुमारे दीड वाजता त्यांनी कलिंगड खाल्ले.त्यानंतर पहाटे ५:३० च्या सुमारास सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. उपचारा दरम्यान अब्दुल्ला यांच्यासह त्यांच्या पत्नी नसरीन आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब  यांचा मृत्यू झाला होता.

 प्राथमिक अंदाजानुसार कलिंगडमुळे ही विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कलिंगड हे नैसर्गिकरित्या इतके घातक नसते, त्यामुळे त्यात काही भेसळ होती का किंवा इतर काही कारण आहे, याचा तपास पोलीस आणि आरोग्य विभाग करत आहेत. कलिंगडामुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ आहे. त्यामुळे नेमके कारण शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगितले जात आहे. या घटनेमुळे लोकांनी कलिंगडकडे पाठ फिरवली असून कलिंगड उत्पादन संकटात आले आहे.

सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या घटनेचे आज मंत्रिमंडळ बैठकीतही पडसाद उमटले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हे कलिंगड प्रकरण काय आहे अशी विचारणा करीत या विषयाला हात घातला. त्यावर अन्य काही मंत्र्यांनीही कलिंगडमुळे विषबाधा कशी होऊ शकते अशी विचारणा केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी मंत्र्यांची समजूत काढताना हा प्रकार नेमका कलिंगडमुळेच झाला आहे का याची अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून चौकशी अंती हे मृत्यू कलिंगडमुळे झाले आहेत की अन्य कोणत्या कारणाने झाले आहेत हे स्पष्ट होईल असे सांगत या विषयावर पडदा टाकला.