करोना उपचारांसाठी रुग्णांकडून अवाजवी पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात पालिकेला यश आले आहे. २६ रुग्णालयांविरोधातील १३४ तक्रारी सोडवण्यात आल्या असून २३ लाख ४२ हजार रुपयांनी देयकांची रक्कम कमी झाली आहे.

करोना आजारावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारींचा निपटारा होऊन एकूण २३ लाख ४२ हजार रुपयांनी देयकांची रक्कम कमी झाली आहे.

करोना रुग्णांना उपचारांसाठी मोठय़ा प्रमाणावर खाटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयनदेखील महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. या  खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून दिनांक २१ मे  रोजीच्या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे अपेक्षित आहे. मात्र खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे.

अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करणे शक्य

खासगी रुग्णालयामधील खाटांचे वितरण प्रभावीपणे होण्यासह वैद्यकीय सेवा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात, याकरिता  समन्वय साधण्यासाठी या ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाने केली आहे. एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास संबंधित खासगी रुग्णालयासाठी ज्या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे थेटपणे तक्रार नोंदविता येते.