‘पेटीएम’च्या महा‘आयपीओ’कडून भ्रमनिरास ; पदार्पणालाच २७ टक्क्य़ांची घसरण; गुंतवणूकदारांचा तोटा

कंपनीने गेल्या आठवडय़ात भांडवली बाजारातून १८,३०० कोटी रुपयांची विक्रमी भांडवल उभारणी केली होती.

मुंबई : इतिहासातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीच्या सफलतेनंतर, गुरुवारी भांडवली बाजारातील ‘पेटीएम’च्या समभागांचे पदार्पण गुंतवणूकदारांसाठी स्वप्नभंग ठरले. मोठय़ा फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना सूचिबद्धतेच्या दिवशी कंपनीचा समभाग २७ टक्क्य़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले. या फज्जामागे सुमारे तीन हजार कोटींचा व्यावसायिक तोटा नोंदविणाऱ्या कंपनीच्या समभागांची इतक्या चढय़ा मूल्यांकनाने विक्री कशी होऊ शकली, यावर विश्लेषकांची चर्चा सुरू आहे.

डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागांच्या भांडवली बाजारातील सूचिबद्धतेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. कंपनीने गेल्या आठवडय़ात भांडवली बाजारातून १८,३०० कोटी रुपयांची विक्रमी भांडवल उभारणी केली होती. या भागविक्रीसाठी जवळपास दुप्पट (१.८९ पट) भरणा गुंतवणूकदारांकडून केला गेला. अर्थात, कंपनीने प्रारंभिक विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ४.८३ कोटी समभागांच्या तुलनेत ९.१४ कोटी समभागांसाठी बोली लावणारे अर्ज आले होते. 

‘पेटीएम’च्या समभागाने सुरुवात घसरणीसह केली असली तरी कंपनीने पदार्पणाच्या दिवशी एक लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल मिळविले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग २७.२५ टक्क्य़ांच्या घसरणीसह १,५६४.१० रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या समभागाच्या गुरुवारच्या बंद भावानुसार तिचे बाजार भांडवल मुंबई शेअर बाजारात १,०१,३९९ कोटी रुपयांवर आहे.1

प्रति समभाग ५८६ रुपयांचे नुकसान

‘पेटीएम’च्या समभागाने गुरु वारी मुंबई शेअर बाजारात १,९५० रुपयांवर व्यापार सुरू केला. प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग २,१५० रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र मोठय़ा फायद्यासह सूचिबद्धता होण्याऐवजी समभागाने ९.३ टक्के घसरणीसह सुरुवात करीत निराशा केली. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने १,५६४ रुपयांचा किमतीतील तळ गाठला. दिवस सरताना प्रति समभाग ५८५.८५ रुपयांच्या तोटय़ासह १,५६४.१० रुपये पातळीवर तो स्थिरावला.

भावुकता आणि हर्ष..

मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीतील ‘आंतरराष्ट्रीय परिषद सभागृहा’त गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पेटीएमच्या समभाग सूचिबद्धतेच्या कार्यक्रमाला उत्सवाचे रूप होते. समभागाचे पहिले पाऊल जरी घसरणीसह झाले तरी उत्साह आणि हर्षांने भारलेल्या वातावरणाला ते गालबोट लावू शकले नाही. परंपरेने औपचारिक घंटानाद करताना, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या सोहळ्याला शर्मा यांच्यासह कंपनीचे मुख्य वित्तीय आधिकारी मधुर देवरा, गुंतवणूक बँकांचे प्रतिनिधी आणि मुंबई शेअर बाजाराचे प्रमुख आशीष चौहान आणि अधिकारी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Paytm ipo crashes over 27 percent on market debut zws