मुंबई : अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी शिक्षकांची संख्या किंवा सुविधा वाढविण्याची सवलत देऊन भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडून (पीसीआय) नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली जात होती. मात्र याचा गैरफायदा घेऊन अनेक महाविद्यालये मान्यता मिळाल्यानंतर निकषांची पूर्तता करत नाहीत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव व शिक्षकांची कमतरता दिसून येत आहे. याचा परिणाम शिक्षणावर होत असल्याने नव्या महाविद्यालयात आवश्यक पायाभूत सुविधा असल्याशिवाय परवानगी न देण्याचा निर्णय ‘पीसीआय’ने घेतला आहे.

फार्मसी अभ्यासक्रमाला मान्यता घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शिक्षकवर्ग, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मुभा पीसीआयकडून दिली जात होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने २९ मे २०२६ रोजी मान्यतेसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीचा पीसीआयकडून पुनर्विचार करण्यात आला आहे. त्यानुसार पीसीआयच्या नुकत्याच झालेल्या केंद्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यासंदर्भात सुधारित निर्देश जारी केले आहेत. यामध्ये शिक्षकवर्ग आणि पायाभूत सुविधांची वर्षनिहाय पूर्तता करण्याची पूर्वीची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार संबंधित अभ्यासक्रम आणि मंजूर प्रवेश क्षमतेनुसार आवश्यक असलेला संपूर्ण शिक्षकवर्ग, प्रयोगशाळा, उपकरणे, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रशासकीय सुविधा आणि इतर निर्धारित सुविधा अभ्यासक्रमाच्या प्रारंभापासूनच उपलब्ध असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शैक्षणिक निकषांचे पालन योग्यरित्या होत असल्याचे सुनिश्चित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

नियमित पूर्णवेळ शिक्षकच ग्राह्य

अभ्यासक्रम आणि प्रवेश क्षमतेनुसार आवश्यक शिक्षकांची संख्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीपासून पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. केवळ संमती दिलेल्या प्राध्यापकांच्या आधारे निर्धारित शिक्षकसंख्येची पूर्तता झाल्याचे ग्राह्य धरले जाणार नाही. ज्या ठिकाणी पूर्णवेळ नियमित शिक्षकांची आवश्यकता आहे, तेथे नियुक्त केलेले नियमित आणि पूर्णवेळ शिक्षकच ग्राह्य धरले जातील. संबंधित शिक्षकांकडे पीसीआयच्या वैधानिक नियमांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे बंधनकारक आहे. शिक्षकांची पात्रता, अनुभव, पदनाम, कामाचे स्वरूप, कार्यभार तसेच इतर लागू अटींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि ग्रंथालय आवश्यक

शिक्षकवर्गाप्रमाणेच पायाभूत सुविधांबाबतही सुरुवातीपासूनच पूर्ण तयारी ठेवावी लागणार आहे. प्रयोगशाळा, उपकरणे, वर्गखोल्या, प्रशासकीय सुविधा, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि इतर सर्व निर्धारित सोयी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीपासूनच उपलब्ध असणे आवश्यक आहे.

चुकीची माहिती दिल्यास होणार कारवाई

शिक्षकवर्ग, पायाभूत सुविधा किंवा इतर सुविधांबाबत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केल्यास फार्मसी कायदा, १९४८, लागू नियमावली आणि पीसीआयच्या निकषांनुसार कारवाई केली जाणार आहे.