शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिक उसळून उठतील असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र दस्तुरखूद्द उद्धव ठाकरे यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर आज (गुरुवार) ठिकठिकाणच्या शिवसेनेच्या शाखा, मध्यवर्ती कार्यालयांमध्ये सामसूम होती. चौक, नाक्यानाक्यांवर उभ्या असलेल्या शिवसैनिकांमध्ये कुजबूज सुरू होती.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा, सहकाऱ्यांनी केलेला दगाफटका यामुळे शिवसैनिक प्रचंड दुखावले आहेत. अनेक शिवसैनिकांनी बुधवारी रात्रीपासून समाज माध्यमांवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळी, प्रभादेवी, शिवडी, लालबाग, परळ, गिरगावसह विविध भागांतील शिवसेना शाखा, मध्यवर्ती कार्यालयांबाहेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत शिवसैनिक घोळक्याने जमले होते. मात्र या सर्व भागात गुरुवारी सकाळपासून सर्वत्र शांतता होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन करणार असल्याचे वृत्त गुरुवारी दुपारनंतर पसरले आणि शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. गटागटाने उभ्या असलेल्या शिवसैनिकांमध्ये पक्षप्रमुखांबद्दल आदर, तर बंडखोरांबद्दल नाराजीचा सूर आळवण्यात येत होते. त्याचबरोबर आगामी निवडणुकीला कसे सामोरे जायचे याबाबतही शिवसैनिकांमध्ये चर्चा रंगली होती.

शिवसेनेच्या शाखांमध्ये नेहमी सकाळापासून कार्यकर्त्यांची आणि मदत मागायला येणाऱ्या नागरिकांची असते. मात्र बुधवारच्या घडामोडींनतर शाखा कार्यालयांमध्ये सकाळ शांतता होती. शाखेच्या परिसरातील पोलीस बंदोबस्तामुळे वातावरणात काहीसा तणाव जाणवत होता.