हिंदमाता परिसरात पाणी साचण्याच्या समस्येतून सुटका झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील अन्य समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. या परिसरात आता पादचारीपूल बांधण्यात येणार आहे. मुसळधार पावसातही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हिंदमाता उड्डाणपूल आणि परेल उड्डाणपूलादरम्यान उन्नत मार्ग (कनेक्टर) बांधण्यात आला होता. त्याच ठिकाणी आता पादचारीपुलही बांधण्यात येणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात हमखास पाणी साचणाऱ्या हिंदमाता परिसरात अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र या उपाययोजनांना यश येत नव्हते. त्यामुळे परिसरात पाणी साचत होते व या पाण्याचा निचराही वेगाने होत नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी गेल्यावर्षी मुंबई महानगरपालिकेने हिंदमाता उड्डाण पूल आणि परेल उड्डाणपूलादरम्यानच्या रस्त्याची उंची १.२ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला. अडीच महिन्यात काम पूर्ण करून जून २०२१ मध्ये पावसाळ्यापूर्वी हा उन्नत मार्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात पूलावरून वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठा वळसा घालून जावे लागत होते. यावर उपाय म्हणून पालिकेच्या पूल विभागाने आता येथे पादचारीपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी पावसाळ्यात हिंदमातामधील पाणी तुंबण्याच्या समस्येतून सुटका झाली आहे. मात्र पादचाऱ्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे येथे पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या पूलासाठी साधारण चार कोटी ८७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल पूर्ण होण्यास दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच या पूलाला सरकता जिनाही असेल अशी माहिती पूल विभागाचे मुख्य अभियंता सतीश ठोसर यांनी दिली.

उन्नत मार्ग बांधल्यामुळे वाहने वेगाने येत असतात. चित्रा सिनेमागृहाकडून समोरच्या बाजूला हिंदमाता कापड बाजाराकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडून जाणे मुश्कील होते. रस्ता ओलांडण्यासाठी किमान दहा मिनिटे पुढे मागे चालत जाऊन मग रस्ता ओलांडावा लागता. त्यामुळे या पुलाची आवश्यकता असल्याचे मत माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केले आहे.

जेव्हीपीडीमध्येही उड्डाणपूल

दरम्यान, अंधेरी पश्चिमेकडील जुहू वर्सोवा मार्गापासून सीडी बर्फीवालापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या पुलासाठी ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलासाठी निविदा मागविण्यात आल्या असून कार्यादेश दिल्यापासून तीन वर्षांत हा पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा पूल बांधून पूर्ण झाल्यानंतर जेव्हीपीडी जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.