मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावर घडलेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली असा ट्विट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेसंदर्भातील प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत जेणेकरून अशा घटना टाळता येतील, असाही सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारने रेल्वे संदर्भातले अनेक प्रकल्प प्रलंबित ठेवले आहेत. रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी २०१६ मध्येच ४५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही असा आरोप चव्हाण यांनी केला.

एल्फिन्स्टन पुलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतून धडा घेऊन निदान आता तरी केंद्राने प्रलंबित प्रकल्पांना सुरुवात करावी अशी आग्रही मागणी चव्हाण यांनी केली आहे. पायाभूत सुविधा मुंबईकरांना पुरवण्यात आल्या नाहीत तर अशा घटना टाळता येणार नाहीत. तसेच सरकारची प्रतिमा मलीन होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केईएम रूग्णालयात जाऊन चेंगराचेंगरी घटनेतील जखमींची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. आम्ही या घटनेचे राजकारण करायला आलो नाही. मात्र लोकांच्या पायाभूत सुविधांचा विचार करता लवकरात लवकर मुंबईकरांना सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी मागणी चव्हाण यांनी केली.