मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन पक्षांच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढला आहे. या कक्षातील पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षात सात वरून अठरावर गेली आहे. पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्चही वाढला असून यंदा तब्बल २० कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. त्यानंतर सात पेंग्विन या कक्षात होते. मग या पेंग्विनच्या जोड्यांना पिल्ले झाली आणि त्याचाही प्राणीसंग्रहालयाने उत्सव केला. या पेंग्विनच्या पिल्लांचे नामकरणही प्राणीसंग्रहालयाने केला. पेंग्विनची संख्या गेल्या सहा वर्षात वाढून तब्बल १८ वर गेली आहे. यात दहा मादी आणि आठ नर यांचा समावेश आहे. पेंग्विनची संख्या वाढण्याबरोबरच पेंग्विनच्या देखभालीचा खर्चही यंदा वाढला आहे. प्राणीसंग्रहायल व्यवस्थापनाने पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांकरीता निविदा मागवल्या आहेत. तीन वर्षांसाठीचा अंदाजित खर्च २० कोटी १७ लाखांवर आहे. तीन वर्षांपूर्वी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने जेव्हा निविदा मागवल्या होत्या तेव्हा त्याचा खर्च १५ कोटी होता.
आणखी वाचा-म्हाडाची सोडतपूर्व प्रक्रिया समजून घेण्याची संधी, माहितीसाठी उद्या ऑनलाइन कार्यशाळा
पेंग्विन कक्षामध्ये ठराविक तापमान राखावे लागत असल्यामुळे विशेष वातानुकुलित कक्ष आणि पेंग्विनसाठीचे अधिवास तयार केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा खर्च जास्त आहे. त्यातच पेंग्विनसाठी डॉक्टर, कक्षासाठी अभियंते आणि तंत्रज्ञ यांची सेवा २४ तास तीन पाळ्यांमध्ये द्यावी लागते. तसेच पेंग्विनना खाद्यपुरवठा असा सगळा खर्च यात समाविष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच कंत्राटात दर तीन वर्षांनी १० टक्के वाढ होत असते त्यामुळे हा खर्च वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, हे पेंग्विन देऊन गुजरातमधून सिंह आणण्याची योजनाही प्राणी संग्रहालयाने आखली होती. त्याकरीता प्रस्तावही पाठवला होता. मात्र गुजरातमधील जुनागढ येथील साकरबाग प्राणी संग्रहालयाकडे पेंग्विन ठेवण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांनी पालिकेच्या प्रस्तावाला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे १८ पेंग्विनची देखभाल महापालिका करीत आहे.
महसूलही वाढला…
पेंग्विनची संख्या आणि देखभाल खर्च वाढलेला असला तरी पेंग्विनच्या आगमनानंतर प्राणीसंग्रहालयाचे महसूलही वाढला असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पेंग्विन कक्षाच्या उभारणीआधी प्राणीसंग्रहालयाचे २०१४ ते २०१७ या तीन वर्षांचे उत्पन्न २ कोटी १० लाख रुपये होते. नंतर हे उत्पन्न दरवर्षी वाढत गेले असून २०२३ मध्ये १२ कोटीचा महसूल जमा झाला तर २०२४ मध्ये गेल्या आठ महिन्यात ५ कोटी ९१ लाखांचा महसूल जमा झाला आहे.