शहरात येऊन पाच महिने लोटलेल्या पेंग्विनचे अखेर सामान्यांना दर्शन होण्याची वेळ महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यातच पेंग्विन पाहण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने फेटाळला असल्याने ३१ मार्चपर्यंत हे पेंग्विन मोफत पाहता येतील. त्यामुळे पेंग्विनदर्शनाला झुंबड उडण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांपूर्वी हम्बोल्ट पेंग्विन आणण्याचा निर्णय घेतला गेल्यापासून आतापर्यंत पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विविध वादात अडकलेल्या पेंग्विनच्या कक्षाचे काम आता अंतिम टप्प्यात असून साधारण महिन्याभरात हे पेंग्विन सर्वसामान्यांना दर्शन देण्यासाठी तयार होतील. मात्र तोपर्यंत आचारसंहिता लागू होणार असल्याने या कार्यक्रमाला राजकीय पक्षांना उपस्थित राहता येणार नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पेंग्विन दर्शनाचे श्रेय घेण्याची शक्यता मावळल्याने निवडणुकीपर्यंत ते किमान मोफत राहील याची काळजी महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने घेतली आहे. मोठय़ांसाठी शंभर रुपये तर १२ वर्षांखालील लहानांसाठी ५० रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे. सुरुवातीला केवळ लहान मुलांना पेंग्विनकक्ष पाहता येईल.