पालिका अधिकारी व अभियंत्यांचे रात्रंदिवस परिश्रम

भायखळ्याच्या उद्यानात पेंग्विनदर्शनाचा मुहूर्त आचारसंहितेच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाल्यावर युद्धस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. शुक्रवारी थायलंडवरून येणारे तंत्रज्ञ पेंग्विनच्या मुख्य कक्षाला काचेची तावदाने लावणार असून त्यानंतर जलदगतीने महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून या कक्षाचे उद्घाटन केले जाईल.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात परदेशी पेंग्विन ठेवण्याचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने स्वबळावर घेतला. एकीकडे पेंग्विनसाठी पिंजरे तयार करतानाच थायलंडहून पेंग्विन मागवण्याचे कंत्राटही करण्यात आले. मात्र कंत्राटदाराकडून कक्ष बांधण्याचे काम वेळेत पूर्ण केले नसल्याने पेंग्विनदर्शन सामान्यांना खुले करण्याचा राजकीय कार्यक्रम आचारसंहितेत अडकण्याची भीती निर्माण झाली. कक्ष पूर्ण करण्याची मुदत तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. सुधारित मुदत ३१ डिसेंबर होती. मात्र पेंग्विनसाठी तयार करण्यात येत असलेल्या १७०० चौरस फुटांच्या शीतगृहाचे बांधकाम साहित्य जहाजाद्वारे येण्यास विलंब झाल्याने या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता मावळली होती. मात्र पालिकेचे अधिकारी व अभियंते यांनी रात्रंदिवस एक करून कक्षाचे काम पूर्ण केले आहे. आता या कक्षाच्या काचा लावण्याचे काम बाकी असून साडेसात मीटर लांब व साडेतीन मीटर रुंदीच्या दोन काचा बसवण्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्याची गरज आहे. या काचा बसवण्यासाठी थायलंडहून तंत्रज्ञ येणार असून या काचा शुक्रवारी लावण्यास सुरुवात होईल असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काचा लावणे हे कौशल्याचे असल्याने प्रत्यक्षात त्या कक्षाला बसवायला घेतल्यावरच नक्की किती वेळ लागेल, हे समजू शकेल, असेही हा अधिकारी म्हणाला.

पालिका निवडणुकांची आचारसंहिता पुढच्या आठवडय़ात लागण्याची दाट शक्यता असून सोमवारच्या आधीच पेंग्विनदर्शनाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे समजते. आचारसंहितेआधी काम पूर्ण होण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

याआधी काय झाले..

दोन वर्षांपूर्वी हम्बोल्ट पेंग्विन आणण्याचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने घेतला. त्यानुसार तीन कोटी रुपये खर्च करून थायलंडवरून सहा पेंग्विन मागवण्यात आले. २६ जुलै रोजी एकाच गटातील सहा पूर्ण वाढ झालेले पेंग्विन व दोन लहान पेंग्विन मुंबईत आले. या पेंग्विनसाठी २५० चौरस फुटांचे क्वारंटाइन बनवण्यात आले. मुख्य कक्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना या लहान जागेत ठेवणे अपेक्षित होते. या आठपैकी एका लहान पेंग्विनचा २३ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. कक्षाचे बांधकाम, पाच वर्षांची देखभाल, दुरुस्ती तसेच पेंग्विन सांभाळण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

  • नूतनीकरण होत असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचा फेरफटका मारून आलेल्या काँग्रेस नगरसेविका वकारुन्निसा अन्सारी यांनी स्थायी समितीत बुधवारी सत्ताधाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले. उद्यानातील काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे ते म्हणाल्या. नेहमी टीकेचा दांडपट्टा चालवणाऱ्या या नगरसेविकेच्या अभिनंदनावर नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे सत्ताधारी बाकांवरील सदस्यांना समजत नव्हते. मात्र पाच मिनिटे चाललेल्या वर्षांवानंतर सेनेच्या नगरसेवकांनी टेबल वाजवून आनंद व्यक्त केला.