scorecardresearch

चार लाख माता गटांच्या सहभागातून लोकचळवळ; शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या १४ लाख मुलांची पूर्वतयारी 

राज्यातील ६५ हजार प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे १४ लाख मुलांची शाळापूर्व तयारी करून घेण्याच्या मोहिमेला आता ४ लाख माता गटांच्या सहभागाने लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

मधु कांबळे

मुंबई : राज्यातील ६५ हजार प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे १४ लाख मुलांची शाळापूर्व तयारी करून घेण्याच्या मोहिमेला आता ४ लाख माता गटांच्या सहभागाने लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुलांना शिक्षणाची गोडी लागणे व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात घरापासूनच करण्याचा हा अभिनव उपक्रम असून, त्याला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी दिली. 

राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये प्रामुख्याने कष्टकरी, निम्न मध्यमवर्गीय पालकांची मुले शिक्षण घेत असतात. सधन वर्गातील मुलांप्रमाणे त्यांना खासगी शिकवण्या लावणे पालकांना परवडत नाही. त्याचा परिणाम म्हणजे जिल्हा परिषदा व पालिकांच्या शाळांमध्ये शिकणारी मुले खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांशी शैक्षणिक स्पर्धा करू शकत नाहीत. त्याचा विचार करून, या वर्षांपासून पहिलीच्या वर्गात दाखल होण्याआधीच त्या मुलांना शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने आणि मातांच्या सहभागाने शाळेतले पहिले पाऊल, हा शालेय शिक्षण विभागाने अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

गेली दोन वर्षे करोना महासाथीमुळे मुले शाळेत जाऊ शकली नाहीत, त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला आहे. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा प्रयत्नही या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे वर्षां गायकवाड यांनी सांगितले. साधारणत: एप्रिलमध्ये राज्यात या अभियानाला सुरुवात करण्यात आली. राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये पहिल्याची वर्गात जाण्याआधीच्या मुलांचे व पालकांचे मेळावे घेण्यात आले. गावागावांत प्रभात फेऱ्या काढून शिक्षणाबद्दलचे एक उत्साहाचे वातावरण तयार करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून शाळेत जाण्यापूर्वी या मुलांचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणिताची पूर्वतयारी करून घेतली जात आहे. पहिल्या वर्गात म्हणजे शिक्षणात पहिले पाऊल टाकणाऱ्या मुलांना गोंधळल्यासारखे होऊ नये, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या अभियानामागचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनुदान उपलब्ध

राज्यात २६ जूनपर्यंत म्हणजे शाळा सुरू होईपर्यंत हे अभियान सुरू राहील. यंदा पहिल्याच्या वर्गात साधारणत १४ लाख मुले प्रवेश घेतील. त्यांची ही शाळापूर्व तयारी आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चार ते पाच महिलांचा सहभाग असलेले माता गट स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात ४ लाख माता गट कार्यरत आहेत. त्यामुळे या अभियानाला एक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे वर्षां गायकवाड यांनी सांगितले. या उपक्रमासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान उपलब्ध होत असून, या वर्षांसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सर्वशिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People movement participation mothers groups preparation children school ysh

ताज्या बातम्या