गेली १५-१६ वर्षे भर दुपारी पाणीपुरवठा होत असल्यामुळे त्रस्त झालेले बोरिवलीमधील रहिवाशी पाणी पुरवठय़ाची वेळ बदलून मिळावी यासाठी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या प्रश्नावर जलविभागातील अभियंत्यांबरोबर बैठक घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
बोरिवलीच्या चारकोप परिसरात दुपारी १२.३० वाजता पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला पाणी भरण्यासाठी घरी थांबावेच लागते. दुपारी १२.३० च्या सुमारास मुलांना शाळेत सोडणे अथवा घरी घेऊन येण्याची वेळ असते. त्यातच पाणीही भरुन ठेवायचे असते. त्यामुळे अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. मनसेचे उपाध्यक्ष नयन कदन यांनी या संदर्भात चारकोप परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. नगरसेवक चेतन कदम यांनी याबाबत महापौर सुनील प्रभू यांना पत्र पाठवून त्यांच्या दालनात मुख्य जलअभियंता रमेश बांबळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची विनंती केली आहे.