करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेने आक्रमक भूमिका घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असे म्हटले होते. त्यावर करोनाचे नियम तोडून दहीहंडी उत्सव साजरा करुन काय मोठं स्वातंत्र्य मिळवलं नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर भाष्य केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना ब्रिटीश अधिकारी रँडशी केली आहे. “प्लेग ची साथ आहे या नावावर १८९७ साली रँडने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँडला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“राजकीय नेत्यांनी लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नका”; वळसे पाटलांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष सल्ला

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. करोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट करोना वाटप. याला विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही आहे. जगामध्ये आज ज्या काही गोष्टी मानल्या गेल्या आहेत की मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात हे नमूद केलं आहे.”

“करोनाचे नियम तोडून…”; दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना ‘मनसे’ टोला

सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही- उद्धव ठाकरे

“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण करोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी करोनाविरुद्ध आंदोलन करा,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

जनतेला घाबरवण्यासाठी करोनाची लाट आणली जात आहे; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

पाठीत खंजीर खुपसणारे ‘हे’ दुसरे- चंद्रकांत पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काही लोक दररोज सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागले आहेत. पण, त्याने काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली.