लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेची निवडणूक जवळ आली असून मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट होती. त्यापाठोपाठ पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. आपापल्या विभागातील विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेण्यात आली.

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असून सप्टेंबरमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे मुंबईतील विद्यामान आमदार आणि माजी नगरसेवक पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे पालिका स्तरावरील प्रश्न घेऊन आमदार मुख्यालयात, पालिकेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह येऊ लागले आहेत. गेल्याच आठवड्यात शिवसेनाचे (शिंदे गट) ४० माजी नगरसेवक पालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. त्यानंतर वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वरळीतील माजी नगरसेवकही पालिका मुख्यालयात आले होते. भाजपचे आमदार आशिष शेलार हे देखील काही नगरसेवकांसह आले होते. त्यातच मंगळवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ६० माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात दाखल झाले.

आणखी वाचा-सलग सुट्ट्यांनिमित्त मध्य रेल्वेच्या १८ विशेष रेल्वेगाड्या धावणार

पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदींची या माजी नगरसेवकांनी भेट घेतली. सर्व २४ विभागातील सहाय्यक आयुक्त या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी नगरसेवकांनी आपापल्या विभागातील रखडलेल्या कामांची, समस्यांची माहिती अधिकाऱ्यांना दिली. लोढा यांनी सर्व विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, कमलेश यादव, अभिजित सामंत, राजेश्री शिरवडकर आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.

आणखी वाचा-‘एमएसआरडीसी’ची म्हाडाला १,८२३ घरे; एकात्मिक नगर वसाहत योजनेद्वारे पनवेल खालापूरमधील सदनिका

‘समन्वय बैठक’

गेली अडीच वर्षे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे महापालिका प्रशासन व नागरिकांचा समन्वय साधण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुंबईमधील शहरातील शौचालय दुरुस्ती / पुन:र्बांधणीबाबत होणारा विलंब, अद्याप काही ठिकाणी आपला दवाखाना कार्यरत झालेला नाही, विविध उद्यानांचे रखडलेले सुशोभीकरण, महापालिका आरोग्य सेवेतील बंद असलेली रुग्णालय / प्रसूतिगृहे आदी कामे तातडीने पूर्ण करून करावी, रस्त्यांची कामे जलद गतीने पूर्ण व्हावीत, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.