प्रसाद रावकर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून या सोडतीत खुल्या प्रवर्गातील तब्बल १०९, अनुसूचित जातीतील आठ, तर अनुसूचित जमातीतील एक असे एकूण ११८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. मात्र सोडतीनुसार काही माजी नगरसेविकांचे प्रभागांवर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून या प्रभागांतून निवडणूक लढविण्यासाठी माजी नगरसेविका आग्रही आहेत. परिणामी मुंबई महानगरपालिकेतील भावी नगरसेवकांमध्ये महिलांची संख्या अधिक असणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत होऊ न शकलेला निर्णय, प्रभाग फेररचना आदी विविध कारणांमुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ७ मार्च २०२२ पर्यंत होऊ शकली नाही. सभागृहाची मुदत संपुष्टात आल्याने अखेर मुंबई महानगरपालिकेची सर्व सूत्रे प्रशासक या नात्याने पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये एकूण ११८ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. 

पूर्व उपनगर, शहरात महिलांना अधिक संधी राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या फेररचनेमध्ये पश्चिम उपनगरांत १ ते १०५, पूर्व उपनगरांत १०६ ते १७७ आणि शहर परिसरात १७८ ते २३६ अशी प्रभागांची विभागणी झाली आहे. पश्चिम उपनगरांच्या १०५ प्रभाग आले आहेत, तर पूर्व उपनगर आणि शहर परिसराच्या वाटय़ाला अनुक्रमे ७२ व ५९ प्रभाग आले आहेत. पश्चिम उपनगरांतील १०५ पैकी ४६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असून उर्वरित ५९ प्रभाग खुले झाले आहेत. त्याचबरोबर पूर्व उपनगरांतील ७२ पैकी ३८, तर शहरांतील ५९ पैकी ३४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. पूर्व उपनगर आणि शहरात पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक संधी मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची २०१७ मध्ये २२७ प्रभागांमध्ये निवडणूक झाली होती. यापैकी ११४ प्रभाग महिलांसाठी आरक्षित होते. मात्र या निवडणुकीत १३२ महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांची संख्या ११५, तर नगरसेविकांची संख्या १३२ इतकी होती. आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या नऊने वाढली असून २३६ प्रभागांमध्ये निवडणूक होणार असून महिलांसाठी ५० टक्के म्हणजे ११८ प्रभाग आरक्षित आहेत. त्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील महिलांसाठीच्या आरक्षित प्रभागांचाही समावेश आहे.

माजी नगरसेविका खुल्या प्रभागात आग्रही

पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहरात अनुक्रमे ५९, ३४ आणि २५ अशा एकूण ११८ प्रभागांमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी पुरुष उमेदवारांना मिळू शकते. मात्र यापैकी काही खुल्या प्रवर्गातील प्रभागांमधून मागील निवडणुकीत महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. मागील निवडणुकीत विजय मिळवून देणारा आणि आता खुल्या प्रवर्ग म्हणून आरक्षित झालेल्या आपल्या प्रभागातून आगामी निवडणूक लढविण्याची संधी मिळावी असा आग्रह माजी नगरसेविका धरू लागल्या आहेत. त्यामुळे अशा प्रभागांमध्ये उमेदवारी देण्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. अशा प्रभागांमध्ये बंडखोरीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, संध्या दोशी, शीतल म्हात्रे, गीता सिंघण, शुभदा गुडेकर आदींचे प्रभाग खुले झाले आहेत.