मुंबई : ‘ताल हा सगळ्यात आधी आपल्याला हृदयातून जाणवतो. कला सादर करताना आपण जे काही करतो ते अगदी सहज होत असते. आणि त्यातच सुंदरता आहे’ असं म्हणणारे आणि संगीताच्या त्यातही तालवाद्यांच्या जगात अखंड रमणारे, नवे काही निर्माण करणारे प्रसिद्ध आणि प्रतिभावंत तालवादक तौफिक कुरेशी यांच्याशी संवाद साधण्याचा योग ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून जुळून आला आहे.

‘लोकसत्ता गप्पा’चे नवे पर्व तालवाद्याचे बादशाह म्हणून नावाजलेल्या तौफिक कुरेशी यांच्या भेटीने रंगणार आहे. शनिवारी, ५ जुलै रोजी होणाऱ्या ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात तौफिक कुरेशी यांच्याशी लेखक – गायक डॉ. आशुतोष जावडेकर संवाद साधणार आहेत. कलात्मक अभिव्यक्तीच्या सर्जक क्षेत्रांत नावारूपाला आलेल्या प्रतिभावंतांच्या परिचयाच्या चेहऱ्यापलीकडे त्यांच्या अंतरंगात डोकावण्याची, त्यांच्यातील विविधांगी पैलूंना बहर आणण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्याची संधी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमातून मिळते.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र आणि झाकीर हुसेन यांचे धाकटे बंधू तौफिक कुरेशी यांच्यावर लहानपणापासूनच नकळत तालाचे संस्कार घडले. मात्र अब्बाजी आणि थोरले बंधू झाकीर यांच्याप्रमाणे पारंपरिक तबलावादन करण्याबरोबरच विविध तालवाद्ये त्यांना खुणावत होती. तबला, ढोलक, पखवाज यांसारख्या पारंपरिक भारतीय वाद्यांव्यतिरिक्त जेम्बे आणि बोंगो यांसारख्या परदेशी वाद्यांवरही प्रभुत्व मिळवणाऱ्या तौफिक कुरेशी यांनी कोणाकडेही तालवाद्ये वाजवण्याचे शिक्षण घेतले नव्हते. ही वाद्ये ते स्वतःच वाजवायला शिकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शास्त्रोक्त ताल वाजवण्याचे प्रयोग

आफ्रिकन जेम्बे असो व ड्रम या विविध तालवाद्यांवर भारतीय शास्त्रोक्त ताल वाजवण्याचे प्रयोग त्यांनी रूढ केले. चित्रपट संगीतातही तालवाद्यांचा वापर करण्यात ते रंगून गेले. जगप्रसिद्ध अशा दोन दिग्ग्ज कलावंताचे मार्गदर्शन, त्यांचे प्रेम, पाठींबा असतानाही शास्त्रीय तालवादनात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या तौफिक कुरेशी यांचा प्रवास तितका सहजसोपा नाही. आजवरच्या त्यांच्या या तालप्रवासातील चढ-उतार, कडू-गोड अनुभव आणि त्यातून घडत गेलेला त्यांच्यातील कलावंत समजून घेण्याची संधी लवकरच ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमातून मिळणार आहे.
प्रायोजक पॉवर्ड बाय : व्ही. एम. ज्वेलर्स