मुंबई : कला आणि विज्ञान विद्याशाखेतील पदवी, एखाद्या शाखेतील पदवी घेतलेली असल्यास दुसऱ्या शाखेतील पदवी आणि पात्रतेनुसार पदव्युत्तर पदवी एकाच वेळी मिळवण्याचे स्वातंत्र्य आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे.  शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेऊन, ऑनलाइन किंवा एकत्रित स्वरूपात अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेशकुमार यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. याबाबतची सविस्तर नियमावली बुधवारी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण एकावेळी घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत होते. मात्र आता एकाचवेळी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. त्यामुळे एकाचवेळी दोन पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा एक पदवी आणि पदव्युत्तर पदवी, पदविका आणि पदवी असे वेगवेगळे पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील. दोन वेगवेगळय़ा विद्यापीठांतून किंवा एकाच विद्यापीठाने पर्याय उपलब्ध करून दिल्यास एकाच विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.  आयोगाच्या ३१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार दोन पदवी अभ्यासक्रम एकावेळी करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना यामुळे अधिक शैक्षणिक स्वातंत्र्य मिळेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमतांचा अंदाज घेऊन याबाबत निर्णय घ्यावा. मात्र, तासिकांवर आधारित अभ्यासक्रमांसाठीच ही तरतूद आहे. संशोधनावर आधारित म्हणजे एम.फिल. पीएच.डीसाठी साठी हा पर्याय उपलब्ध नाही , असे डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितले. 

Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

अभ्यासक्रम कसा करता येणार?

दोन्ही अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेऊन करता येतील, एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष आणि एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करता येतील. दोन अभ्यासक्रमांना प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दोन्ही शिक्षणसंस्था अर्थातच एकाच शहरातील असणे आवश्यक आहे. मात्र, एक प्रत्यक्ष आणि एक ऑनलाइन किंवा दोन्ही ऑनलाइन अभ्यासक्रम करायचे असल्यास दोन वेगवेगळय़ा राज्यांमधील शिक्षणसंस्थांमधील अभ्यासक्रमही करता येतील. मात्र, त्यासाठी दोन्ही अभ्यासक्रमांच्या तासिकांच्या वेळा एकत्र असू नयेत, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे. एक अभ्यासक्रम सकाळच्या सत्रातील तर दुसरा सायंकाळच्या सत्रातील असावा. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा संस्थांची निवड करावी लागेल. त्याचबरोबर विद्यापीठांनी अशा स्वरूपात प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिलेली असणे आवश्यक आहे. दोन विद्यापीठे करार करून अभ्यासक्रम, परीक्षा यांच्या वेळांबाबत समन्वय साधूनही विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतील, असे डॉ. जगदेशकुमार यांनी सांगितले. नवी रचना स्वीकारायची किंवा नाही, प्रवेशाचे नियम, हजेरीचे नियम, वेळापत्रक हे ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांना असतील. तसेच विविध विद्याशाखांच्या नियामक प्राधिकरणांचीही परवानगी असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

होणार काय? विद्यार्थी एका विद्यापीठातून बीए करताना दुसऱ्या विद्यापीठातून बी. कॉम़ करू शकतील. म्हणजेच दोन वेगवेगळय़ा विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे शिक्षण एकाचवेळी घेता येईल. एखाद्या विद्याशाखेतील दोन वेगवेगळय़ा विषयांतील पदवीचे शिक्षण एकावेळी घेता येईल. म्हणजेच रसायनशास्त्रात बी.एससी करताना भौतिकशास्त्रातही बी.एससी करता येईल. एखाद्या विषयातील पदवी घेतलेली असल्यास दुसऱ्या विषयातील पदवी आणि पूर्वी घेतलेल्या पदवीला अनुषंगिक पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येईल. म्हणजे इतिहास विषयात बीए.ची पदवी असेल तर इतिहास विषयात एम.ए करताना बी.कॉमही करता येईल.