करोनाबाधित गंभीर प्रकृतीच्या रुग्णांवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या उत्पादनासाठी सिप्ला आणि हेट्रो या दोन भारतीय कंपन्यांना भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून (डीसीजीआय) परवानगी मिळाली आहे. पहिल्या एक हजार कुप्या मुंबई महानगरपालिकेला सिप्लाकडून मोफत दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आता लवकरच शहरातील गरजू रुग्णांसाठी हे औषध उपलब्ध होईल.

अमेरिकास्थित गिलियार्ड कंपनीने उत्पादनाचा परवाना दिलेल्या देशातील चार कंपन्या ‘डीसीजीआय’च्या परवानगीच्या प्रतीक्षेत होत्या. यातील सिप्ला आणि हेट्रो या दोन कंपन्यांना शनिवारी आपत्कालीन स्थितीत उत्पादन आणि विक्रीची परवानगी दिली आहे. उत्पादन सुरू होताच मुंबईला मोठय़ा प्रमाणात याची आवश्यकता असल्याने सिप्लाकडून पहिल्या एक हजार कुप्या पालिकेला मोफत दिल्या जाणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

रेमडेसिवीर सध्या भारतात उपलब्ध नसल्याने गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठी परदेशातून आयात करावे लागत आहे. मुंबई पोलीस दलातील करोनाबाधित व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने बांगलादेशातील कंपनीकडून हे औषध नुकतेच खरेदी करून घ्यावे लागले. यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख ३४ हजार रुपये मोजावे लागले.

वैयक्तिक स्तरावर ‘डीसीजीआय’च्या परवानगीने आत्तापर्यंत राज्यात गंभीर प्रकृतीच्या किमान ५० रुग्णांसाठी परदेशातून हे औषध आयात करण्यात आले. परदेशातून आयात केल्यास दहा कुप्यांसाठी १ लाख २० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र हेच इंजेक्शन भारतातील हेट्रो कंपनी निम्म्याने म्हणजे ६० हजार रुपये दराने देत आहे. महाराष्ट्र चेंबर हाऊसिंग इंडस्ट्रीकडे आर्थिक मदतीची मागणी पालिकेने केली आहे. ही मदत आल्यानंतर लगेचच हेट्रोकडून औषध खरेदीही केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सरकार आणि आयुक्त चहल यांनी पंतप्रधानांकडे रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमाब ही औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

‘सिप्रेमी’ या नावाने लवकरच बाजारात इंजेक्शन उपलब्ध होणार असून देशात रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्यांच्या पाचव्या टप्प्याअंतर्गत वापराचे प्रशिक्षण, रुग्णांची संमती यांसह सर्व कागदोपत्री माहितीचे संकलन केले जाईल. करोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सिप्ला लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग व्होरा यांनी सांगितले.

हेट्रोचे ‘कोविफोर’ लवकरच बाजारात

हैद्राबादस्थित हेट्रो कंपनी भारतीय पद्धतीने निर्मिती केलेले रेमेडेसिवीर १०० मिलीग्रॅम इंजेक्शन ‘कोविफोर’ या नावाने लवकरच देशात सर्वत्र उपलब्ध करणार आहे. करोना साथ उद्रेकामध्ये सर्व रुग्णांना पुरेसे इतके उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे हेट्रो समूहाचे अध्यक्ष डॉ. बी. पार्था रेड्डी यांनी सांगितले.

सिप्ला आणि हेट्रो या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन सुरू होताच औषध खरेदी करून लवकरच राज्यभरात उपलब्ध केले जाईल.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री