मुंबई: पाळीव श्वानांच्या मालकांनी इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे; श्वानाच्या हल्ल्यात एकजण जखमी | Pet owners need to take care of the safety of others mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: पाळीव श्वानांच्या मालकांनी इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे; श्वानाच्या हल्ल्यात एकजण जखमी

पाळीव श्वानांच्या मालकांनी इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करून एका व्यावसायिकाला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयाने नकार दिला.

Dog-bite-new
संग्रहित छायाचित्र

व्यावसायिकाला तीन महिन्यांचा कारावास

पाळीव श्वानांच्या मालकांनी इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करून एका व्यावसायिकाला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयाने नकार दिला. या व्यावसायिकाच्या पाळीव श्वानाने त्याच्या ७२ वर्षांच्या नातेवाईकाला १३ वर्षांपूर्वी तीनवेळा चावा घेतल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने व्यावसायिकाला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.

हेही वाचा >>>पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली; सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

तक्रारदार वयोवृद्ध असून या वयात त्यांच्यावर आक्रमक श्वानाने तीनवेळा हल्ला केला आणि चावा घेतला. आरोपी व्यावसायिक तरुण असून त्याने अशा आक्रमक श्वानाला सार्वजनिक ठिकाणी फिरायला नेत असताना योग्य काळजी घेणे गरजेचे होते. त्याने ती न घेतल्याने श्वानाने तक्रारदारावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले. आरोपीने आपल्या आक्रमक पाळीव श्वानाला बाहेर नेताना आवश्यक काळजी न घेणे हे इतरांसाठी घातक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपीला दया दाखवण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही न्यायालयाने व्यावसायिकाला दोषी ठरवताना नमूद केले.

रॉटविलर हा आक्रमक श्वान म्हणून ओळखला जातो. गाडीचा दरवाजा उघडताना श्वान आक्रमक झाल्याचे आरोपीला माहीत होते. त्यानंतरही त्याने कोणतीही काळजी न घेता गाडीचे दार उघडले. परिणामी श्वानाने तक्रारदारावर हल्ला करून तीनवेळा चावा घेतला. हेही न्यायालयाने आरोपीला दिलासा नाकारताना नमूद केले.

हेही वाचा >>>मुलीच्या नावाचं ट्विटरवर ‘फेक अकाऊंट’, बाळासाहेब थोरात म्हणाले, “माझी कन्या शरयू…”

आरोपीविरोधात तक्रारदार केर्सी इराणी, घटनेच्या वेळी त्यांच्यासह असलेला त्यांचा मुलगा हॉर्मस, इराणी यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, रॉटविलर यांची तपासणी करणारे पशुवैद्य आणि तपास अधिकारी यांनी साक्ष दिली. आरोपीने गाडीचे दार उघडताच श्वानाने आपल्यावर हल्ला केला. त्यामुळे आपण खाली पडलो. त्यानंतर श्वानाने आपल्यावर पुन्हा हल्ला केला आणि आपल्या उजव्या हाताला चावा घेतल्याचे तक्रारदाराने साक्ष नोंदवताना न्यायालयाला सांगितले. दुसरीकडे, आरोपी सायरस पर्सी हॉर्मुसजी (४४) यांनी श्वान आपला नसल्याचा दावा केले.

तथापि, न्यायालयाने पशुवैद्यकाने दिलेल्या साक्षीकडे लक्ष वेधले. २ जून २०१० रोजी होर्मुसजी श्वानाच्या सामान्य तपासणीसाठी मलबार हिल पोलीस ठाण्याचे पत्र घेऊन रुग्णालयात आल्याचे या पशुवैद्यकाने साक्षीत सांगितले होते. या पशुवैद्यकाच्या साक्षीनुसार, श्वान आरोपीच्या मालकीचा असल्याचे दाखवते. पशुवैद्यकाने आरोपीविरुद्ध खोटी साक्ष देण्याचे कारण नाही, असेही न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना नमूद केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:00 IST
Next Story
मुलीच्या नावाचं ट्विटरवर ‘फेक अकाऊंट’, बाळासाहेब थोरात म्हणाले, “माझी कन्या शरयू…”