शीना बोरा हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना जबाब नोंदविण्यासाठी बुधवारी खार पोलीस ठाण्यामध्ये बोलावले होते. सुमारे दोन तास पीटर मुखर्जी यांच्याकडून माहिती घेण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. मुंबई पोलीसांनी बोलावल्यानंतर बुधवारी सकाळी पीटर मुखर्जी खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. यावेळी या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचे वकीलही पोलीस ठाण्यात उपस्थित होते. दरम्यान, मुंबई पोलीसांनी कोलकात्यामधून संजीव खन्ना याचा लॅपटॉप जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीसांनी गेल्या आठवड्यात पीटर मुखर्जी यांचा प्राथमिक जबाब नोंदविला होता. मात्र, सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम बाकी होते. त्यासाठीच त्यांना बुधवारी पुन्हा एकदा खार पोलीस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यात आली. शीना बोरा हत्याकांडाशी संबंधित काही माहिती पीटर मुखर्जी यांच्याकडून मिळाल्यास त्याचा पोलीस पुरावा म्हणून वापर कर शकतील. त्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली.
शीना बोराची हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी २४ ऑगस्ट रोजी इंद्राणी मुखर्जीला अटक केली. याप्रकरणी तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्याम राय यांनाही पोलीसांनी अटक केली आहे. या सर्वांना वांद्रे न्यायालयाने पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इंद्राणी मुखर्जीने अखेर शीना बोरा हिच्या हत्येत सामील असल्याचा आपला गुन्हा कबूल केला आहे. तिच्या कबुलीजबाबामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.