शीना बोरा हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या पीटर मुखर्जी याच्या सीबीआय कोठडीत सोमवारी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार हे कारण असल्याचा दावा सीबीआयकडून न्यायालयात करण्यात आला. पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीत दहा दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २६ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला.
पीटर मुखर्जी याला गेल्या शुक्रवारी महानगरदंडाधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. शीनाच्या हत्येचा कट रचणे आणि हत्या केल्याचा आरोप सीबीआयने पीटरवर ठेवला आहे. गेल्या गुरुवारी एकीकडे सीबीआयच्या एका पथकाकडून इंद्राणी आणि प्रकरणातील अन्य दोन आरोपींविरोधात महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल केले जात असताना दुसरीकडे सीबीआयच्या दुसऱ्या पथकाकडून पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती. पीटरला शुक्रवारी कोठडीसाठी अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी आर. व्ही. अदोणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. शीनाच्या हत्येचा कट रचण्यामध्ये इंद्राणीसह पीटरचाही समावेश होता. शीनाची हत्या करण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती, असे सीबीआयच्या वतीने अ‍ॅडिशन सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.