मुंबई : गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या वास्तव्यास असलेले एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक फायद्यासाठी बंडखोरी करून आपल्या घटनात्मक कर्तव्याचा भंग केल्याबद्दल, तसेच चांगल्या प्रशासनामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गुवाहाटीपर्यंतच्या प्रवासाची व तेथील वास्तव्याच्या खर्चाच्या चौकशीची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

उत्पल चंदावार, अभिजीत घुले-पाटील, नीलिमा वर्तक, हेमंत कर्णिक, मनाली गुप्ते, मेधा कुळकर्णी, माधवी कुलकर्णी या सात जणांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सोमवारी सादर करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्याच वेळी कधी सुनावणी घेणार हेही स्पष्ट केले नाही. या मंत्र्यांनी बंडखोरी केल्याने प्रशासकीय आणि सार्वजनिक कामे खोळंबली आहेत. परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.