गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी

मुंबई : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. असंतुष्टतेच्या कारणास्तव शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात या तिघांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मज्जाव करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात येत असून त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले जात आहेत, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

ठाकरे पिता-पुत्र आणि राऊत यांच्या धमक्यांमुळे बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. बंडखोर आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील आणि शवविच्छेदनासाठी ते थेट शवागृहात पाठवले जातील, अशी धमकी राऊत यांनी दिली आहे. अशाप्रकारे धमक्या देऊन, शिवसैनिकांना बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने करण्यास प्रवृत्त करून ठाकरे पिता-पुत्र आणि राऊत राज्यात दंगल व हिंसाचाराची परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.