मुंबई : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

 पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. असंतुष्टतेच्या कारणास्तव शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात या तिघांना पत्रकार परिषदा, दौऱ्यांमध्ये कोणतेही वक्तव्य करण्यापासून मज्जाव करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आणि राऊत यांच्याकडून त्यांच्यावर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. त्यांच्या या शाब्दिक हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने करण्यात येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ठाकरे पिता-पुत्र आणि राऊत यांच्या धमक्यांमुळे बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.