कोट्यवधींच्या मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीचा साथीदार रविचंदर अलिमुथू याने त्याच्यावरील पेट्रोल-डिझेल भेसळ घोटाळ्याचा आरोप मान्य केला असून सीबीआयच्या विरोधानंतरही विशेष न्यायालयाने त्याचा अर्ज मान्य करून त्याला दोषी ठरवले.

तेलगीही या प्रकरणात प्रमुख आरोपी होता. त्याचा २०१७ मध्ये मृत्यू झाला. त्यापूर्वी डिसेंबर २०१२ मध्ये तेलगीने आरोप मान्य असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्याच्यावरील सर्व आरोपांत त्याला दोषी ठरवून सात वर्षांच्या सश्रम कारावासासह ८० हजार रूपयांचा दंड सुनावला होता.

मुद्रांक घोटाळ्याच्या तपासादरम्यान पेट्रोल आणि डिझेल भेसळ प्रकरण उघडकीस आले होते. हे प्रकरण ५०० टन नफ्याच्या आयातीशी संबंधित होते. राज्यभरातील पेट्रोलपंपांना ज्वलनशील द्रवासह भेसळ असलेले इंधन पुरवले जात असल्याचा सीबीआयचा आरोप होता. सीबीआयने २००७ मध्ये अलिमुथूवर दाखल केलेल्या आरोपपत्रात, त्याने गुन्ह्यासाठी परवानग्या घेणारी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यात दंडाधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा समावेश होता.

अलिमुथू याने वैयक्तिकरित्या न्यायालयासमोर अर्ज केला आणि त्याच्यावर ठेवण्यात आलेले सगळे आरोप त्याला मान्य असल्याचे सांगितले. आपली आर्थिकस्थिती हालाखीची असून आपला हा अर्ज मान्य करण्यात यावा, अशी विनंतीही त्याने न्यायालयाकडे केली. मात्र खटल्याच्या या टप्प्यावर अलिमुथू त्याच्यावरील गुन्हा मान्य करू शकत नाही आणि न्यायालयानेही त्याची विनंती मान्य करून त्याला दोषी ठरवू नये, असा दावा करून सीबीआयने त्याच्या अर्जाला विरोध करताना केला. अलिमुथू याने २०१५ मध्ये आरोपनिश्चितीच्या वेळी त्याच्यावरील आरोप अमान्य केले होते आणि त्यामुळेच त्याच्यावरील खटला सुरू झाल्याचेही सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

विशेष सीबीआय न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देऊन अलिमुथूचा गुन्हा मान्य असल्याचा अर्ज मंजूर केला. खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर आरोपीच्या अशा मागणीला परवानगी दिल्यास, खटला लवकर निकाली काढता येईल आणि न्यायालयाचा अमूल्य वेळ वाचेल, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले होते.