scorecardresearch

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात सहा दिवसात पाचव्यांदा वाढ, आजचे दर किती? वाचा एका क्लिकवर…

देशात इंधनाचा भडका सुरूच आहे. मागील ६ दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

देशात इंधनाचा भडका सुरूच आहे. मागील ६ दिवसात पाचव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. रविवारी (२७ मार्च) पेट्रोल ५० पैशांनी, तर डिझेल ५५ पैशांनी वाढले. त्यामुळे सहा दिवसात ३ रुपये ७५ पैशांपर्यंत ही इंधन दरवाढ झालीय. यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसून त्यांचं आर्थिक गणित कोलमडताना दिसत आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर ११३ रुपये ३५ पैशांवरून ११३ रुपये ८५ पैसे झाले आहेत. डिझेलचे दरही ९७ रुपये ५५ पैशांवरून ९८ रुपये १० पैसे झालेत. दिल्लीत पेट्रोल ९८ रुपये ६१ पैशांवरून ९९ रुपये ११ पैसे झाले, तर डिझेल ८९ रुपये ८७ पैशांवरून ९० रुपये ४२ पैशांवर गेले. देशभरात इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगळे आहेत. संबंधित राज्यांच्या स्थानिक कर आकारणीतील फरकामुळे या दरांमध्ये काहिशी तफावत दिसते.

विशेष म्हणजे देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२१ पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. या काळात कच्चा तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ३० डॉलरची वाढ झाली होती. मात्र, आता निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडताना दिसत आहे.

इंधर दरवाढ का?

भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधन परदेशातून आयात करतो. करोनाच्या काळात किमती घसरल्यानंतर जगभरात नोव्हेंबर २०२० पासून तेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. २२ मार्च रोजी ५० रुपयांच्या वाढीनंतर भारतात १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत नोव्हेंबर २०२० पासून ६० टक्क्यांनी वाढली आहे. जगातील पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रित करण्यात सौदी अरेबियाचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर २०२० पासून सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोने गॅसची किंमत ३७६ मेट्रिक टनांवरून ७६९ मेट्रिक टनांपर्यंत वाढवली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ४१ अमेरिकन डॉलरवरून ११५.४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तेल आणि गॅसच्या किमती फार काळ नियंत्रणात ठेवणे भारतासारख्या देशाला शक्य नाही.

हेही वाचा : “आता फक्त निवडणुकाच दरवाढ…”; सुप्रिया सुळेंचा इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला टोला

रशिया युक्रेन युद्ध

अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी ६५ टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेल आणि गॅसच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. २४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत ७ मार्च रोजी प्रति बॅरल ९० डॉलरवरून वाढून १४० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२० डॉलरच्या आसपास आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel fuel prices hike in india on 27th march 2022 know all details pbs

ताज्या बातम्या