स्वयंपाकाचा गॅस, सीएनजी महाग झालेले असताना दुसऱ्या बाजूला पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने विक्रमी वाढ सुरु आहे. आज पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी महागले. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ९१.०८ रुपये तर डिझेलासाठी ७९.७२ रुपये मोजावे लागणार आहेत. राजधानी दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ८३.७३ तर डिझेलसाठी ७५.०९ रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोलियम उत्पादनांचा अजून जीएसटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्हॅट आणि अन्य स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात पेट्रोलचे दर बदलत जातात. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात रोजच्या रोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किंमती वाढत असताना सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कर कमी केलेला नाही.

ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने ही दरवाढ सुरु आहे. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.