मुंबई : पेट्रोल, डिझेलची सतत दरवाढ होत आहे. सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आखाती युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे त्यात भरच पडत आहे. मागील दहा दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आजघडीला मुंबईत १११.१२ रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल ९६.८६ रुपये प्रति लिटरवर गेले आहे. या महागाईतून सामान्य जनतेला दिलासा देण्याची गरज असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५ टक्के व्हॅट आणि १०.१२ रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. डिझेलवर अंदाजे २४ टक्के व्हॅट आणि ३.०० रुपये प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल – डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा. त्यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७० – ८० रुपयात मिळू शकते, असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.