Petrol Price : मुंबईकर न्यूयॉर्कपेक्षा दुप्पट किंमतीला खरेदी करतायत पेट्रोल!

देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी वाढलेल्या दरांमुळे मुंबईत पेट्रोलच्या किंमती न्यूयॉर्कमधील किंमतींच्या जवळपास दुप्पट झाल्या आहेत!

petrol diesel price today
पेट्रोल-डिझेलच्या किंमती

गेल्या महिन्यात देशात सुरू असलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांचा हंगाम वगळता त्याच्या आधीही आणि त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत्याच राहिल्या आहेत. आज तर देशाची राजधानी मुंबत पेट्रोलनं शंभरी गाठली. मुंबईत आज पेट्रोल १००.७२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९२.६९ रुपये प्रतिलिटर किंमतीला विकलं जात आहे. तुलनेनं मुंबईतल्या पेट्रोलच्या या किंमती थेट अमेरिकेचं आर्थिक केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमधील किंमतीच्या जवळपास दुप्पट आहेत. त्यामुळे मुंबईकरांचं आर्थिक गणित ऐन करोना काळात कोलमडू लागलं असून पेट्रोलच्या दरवाढीवरून राजकीय पक्षांमध्ये मात्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुंबईकरांना पेट्रोल दरवाढीचा दणका!

मुंबईत एकीकडे पेट्रोलच्या किंमती १०० रुपये ७२ पैसे अर्थात १.३९ डॉलर प्रतिलिटर इतक्या झाल्या आहेत. मात्र, ब्लूमबर्गनं न्यूयॉर्क स्टेट एनर्जी रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माहितीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार न्यूयॉर्कमध्ये पेट्रोलच्या किंमती प्रतिलिटर ०.७९ डॉलर झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईत न्यूयॉर्कच्या दुप्पट किंमतीला पेट्रोल मिळत असल्याचं स्पष्ट झालं.

“पेट्रोल दरवाढीवर आंदोलनं करणारे भाजपा नेते आता कुठे लपले?”

सातत्याने वाढत आहेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती

१५ मे पासून एका दिवसाच्या अंतराने किंमतीत सतत वाढ होत आहे, परंतु आज सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या आहेत. आज पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही २३ पैशांची वाढ झाली आहे. देशातील बर्‍याच शहरात पेट्रोल १०० च्या पलीकडे विकले जात आहे आणि राजधानी दिल्लीत ते ९४ च्या पुढे विक्री सुरु आहे. दिल्लीत पेट्रोल ९४.४९ रुपये प्रति लिटर, डिझेल ८५.३८ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९५.९९ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेल ९०.१३ रुपये प्रतिलिटर विकले जात जात आहे.

पुन्हा पेट्रोल दरवाढ! जाणून घ्या नवीन दर

“किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही!”

गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. केंद्र सरकारने सातत्याने विक्रीकरामध्ये केलेली वाढ यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. २०१३पासून आत्तापर्यंत इंधनावरील करांमध्ये जवळपास ६ पट वाढ झाल्याचं देखील आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना भारत पेट्रोलियमचे आर्थविषयक संचालक एन. विजयगोपाल यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. “माझी प्रार्थना आहे की एक तर इंधनाच्या किंमती कमी व्हाव्यात किंवा केंद्र सरकारने कर कमी करावेत. आमच्याकडे इंधनाच्या किंमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये”, असं ते म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Petrol price in mumbai twice than new york after govt increase sales tax on gasoline pmw

ताज्या बातम्या