काही वर्षांपूर्वी खंडणीखोरी हेच संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख अस्र होते. परंतु दोन-तीन वर्षांपासून खंडणीखोरीत संघटित टोळ्यांऐवजी भुरटय़ा चोरांचाच सहभाग अधिक असल्याचे दिसून आले आहे. रवी पुजारी वगळता आता एकही टोळी सक्रिय नसून अनेक जण तडजोडीच्या प्रकरणात तर काही थेट बांधकाम व्यवसायात गुंतल्याचे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी कक्षाकडे सध्या खंडणीप्रकरणात किरकोळ गुन्हे दाखल होत आहेत. संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून खंडणीचे गुन्हे वाढू लागल्यामुळेच या कक्षाची स्थापना करण्यात आली होती. दाऊद, छोटा शकील, छोटा राजन, गुरु साटम, कुमार पिल्ले, गवळी-नाईक टोळी आदींकडून अनेकांना खंडणीसाठी धमकावले जात होते. मात्र आता या सर्व टोळ्या शांत असून अधूनमधून रवी पुजारी टोळीकडून खंडणीसाठी धमकावले जाते, असे खंडणीविरोधी कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या व्यतिरिक्त खंडणीचे फारसे गुन्हे दाखल होत नाहीत, असेही त्याने स्पष्ट केले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईमुळे मुंबईतून संघटित गुन्हेगारांची खंडणीखोरी हद्दपार झाली आहे, याला गुन्हे विभागाचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनीही दुजोरा दिला.