मुंबई: इटलीमधून हद्दपार करण्यात आलेली प्रदूषणकारी ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ नावाने सुरू असल्याची बाब पर्यावरण विभागाकडून फेटाळण्यात आली असली तरी रत्नागिरीतील लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहतीत ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लि.’ हा उद्योग सुरू असल्याचे मान्य करण्यात आले आहे. या प्रकल्प उभारणीसाठी कंपनीला २०२१ सालीच संमतीपत्र देण्यात आले असून जून २०२५ सदर कंपनीने घातक ‘पीएफएएस’चे उत्पादन होत असल्याचे पर्यावरणमंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. हा प्रकल्प बंद करण्याचा वाढता दबाव लक्षात घेऊन पर्यावरण विभागाकडून या कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करण्यासाठी ‘रसायन तंत्रज्ञान संस्थे’ची (आयसीटी) नेमणूक केली आहे.
लोटे परशुराम येथील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ ही प्रदूषणकारी कंपनी असून या कंपनीमधून ‘पीएफएएस’ या अत्यंत घातक विषारी पदार्थाचे उत्पादन घेतले जात आहे. माधव गाडगीळ समिती, कस्तुरीरंगन समिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या राणे समितीच्या शिफारशींचा संदर्भ घेऊन पश्चिम घाट आणि कोकणातील पर्यावरणीय समतोल आणि मानवी आरोग्याला दीर्घकालीन धोका निर्माण करणाऱ्या रासायनिक उद्योगांवर कठोर निर्बंध घालण्याची गरज असल्याची बाब तारांकित प्रश्नाद्वारे शशिकांत शिंदे, सतेज पाटील, अनिल परब यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. यावर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी सदर कंपनीमधून प्रदूषण मानकांपेक्षा अधिक प्रदूषण होत असल्याची बाब फेटाळली आहे. इटलीमधून हद्दपार केलेली मिटेनी एस.पी.ए. ही रासायनिक कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक असल्याची बाबच फेटाळून लावण्यात आली आहे. मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लि. हा उद्योग लोटे परशुराम येथे कार्यरत असल्याचे मात्र त्यांनी मान्य केले आहे.
त्याचप्रमाणे माधव गाडगीळ समिती वा कस्तुरीरंगन समितीने शिफारसी तसेच संवेदनशील गावे या अद्यापि अंतिम नसल्याचेही म्हणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पर्यावरण वने व वतावारणीय बदल मंत्रालयाकडूनही पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचनेनुसार ‘लाल संवर्गा’तील उद्योगांना बंदी असल्याचेही या उत्तरात नमूद करण्यात अलो आहे. मात्र या अधिसूचनेमध्ये परशुराम लोटे गावाचा समावेश नसल्याचेही म्हटले आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला दरवर्षी ८५०० मेट्रिक टन प्रति वर्ष स्पेशालिटी इंटरमिडीएटस इतक्या उत्पादनाला २०२० साली तर प्रकल्प उभारणीसाठी २०२१ साली मंजुरी देण्यात आली.
पर्यावरण अनुमतीचे हस्तांतरण वेगळ्या कंपनीच्या नावाने
प्रकल्प उभारणीसाठी संमतीपत्र प्रदान करण्यात आल्यानंतर लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लि. या नावाने प्राप्त पर्यावरण अनुमतीचे हस्तांतरण मे. यलोस्टोन फाईन केमिकल्स प्रा. लि. या नावाने करण्यात आले आहे. त्यानंतर यलोस्टोन नावानेच उत्पादन सुरू करण्यसाठी २०२३ पासून उत्पादन करण्यास या कंपनीला परवानगी देण्यात आली. या परवान्याची वैधता जून २०२६ पर्यंत आहे. आता यलोस्टोन नावानेच घेण्यात आलेला उत्पादन परवाना पुन्हा लक्ष्मी ऑरगॅनिक यांच्या नावे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीच्या विचाराधीन असल्याचे या उत्तरात म्हटले आहे.
२०२५ पासून घातक पदार्थाचे उत्पादन
एकीकडे प्रदूषणा मानकांनुसारच उत्पादन सुरू असल्याचे पर्यावरण विभागाकडून म्हटले जात असताना संबंधित कंपनीने डिसेंबर २०२३ पासून उत्पादन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे जून २०२५ मध्ये पीएफएस (अत्यंत घातक विषारी पदार्थ) संवर्गातील घटकाचे उत्पादन सुरू केले असल्याचेही या उत्तरात पर्यावरणमंत्र्यांनी नमूद केले आहे. मात्र पाण्यातील पीएफएसच्या प्रमाणासाठी कोणतीही विशिष्ट नियमावली नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पीएफएसची चाचणी आणि देखरेख करीत नाही. तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर उद्योगाच्या सांडपाण्याची चाचणी केली असता हे सांडपाणी संमतीपत्रातील नमूद मानकाच्या मर्यादेत असल्याचे दिसून येत असल्याचेही पर्यारवण मंत्र्यांनी म्हटले आहे.
