मुंबई : औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या प्रवेश फेरीसाठीची यादी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार बी. फार्मसी व सहा वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी (फार्म.डी.) या अभ्यासक्रमासाठी ६ हजार ७२० विद्यार्थ्यांना तसेच दोन वर्षांचा पूर्ण-वेळ पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र एम. फार्मसी व तीन वर्षांचा पूर्ण-वेळ पदव्युत्तर फार्म.डी. (पी.बी.) या अभ्यासक्रमासाठी १ हजार २३८ विद्यार्थ्यांना संधी मिळाली.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या व सहा वर्षांचा पूर्ण-वेळ पदवी (फार्म.डी.) या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या यादीसाठी ८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी पसंती दिली होती. त्यापैकी ६ हजार ७२० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यातील ३ हजार २६५ विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून राज्यातील ५२८ फार्मसी महाविद्यालयातील ४७ हजार १९२ जागांपैकी पहिल्या यादीत १६ हजार ७३४ तर

दुसऱ्या यादीत ७ हजार ४३२ याप्रमाणे दोन्ही यादीत २४ हजार १६६ विद्यार्थ्यांनी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या यादीसाठी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत ८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार तिसऱ्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ७२० विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेशाची संधी उपलब्ध झालेल्या विद्यार्थ्याना महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांनी जर काही कारणाने हा प्रवेश नाकारला तर या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना थेट संस्थात्मक फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर १८ ऑक्टोबर रोजी चौथ्या फेरीसाठी तात्पुरत्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत.