मुंबई : आयफोन मिळताच दुकानदाराच्या खात्यात जमा केलेली एक लाख ८० हजार रुपये आपल्या खात्यात वळती करून सायबर भामट्याने दुकानदाराची फसवणूक केल्याची घटना घाटकोपरमधील फिनिक्स मॉलमध्ये घडली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सध्या मोबाइलप्रेमीमध्ये ‘आयफोन १८’ खरेदी करण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. घाटकोपर येथील फिनिक्स मॉलमधील आयफोनच्या दुकानात चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्याने ‘आयफोन १८’बाबत विचारणा केली. येथील कर्मचाऱ्यांनी तो उपलब्ध असल्याचे सांगताच आरोपीने त्याला ऑनलाइन पैसे भरण्यासाठी लिंक पाठवण्याची विनंती केली. दुकानातील एका कर्मचाऱ्याने त्याला लिंक पाठवली. त्यानुसार सायबर भामट्यांनी पैसे पाठवले आणि मोबाइल घेण्यासाठी त्याच्या एका साथीदाराला पाठवले.

खात्यात १ लाख ८० हजार रुपये जमा झाल्याने दुकानदाराने तत्काळ त्या व्यक्तीला आयफोन दिला. मात्र काही वेळानंतर बँक खात्याचा तपशील पहिला असता, ही रक्कम पुन्हा मोबाइल घेणाऱ्याच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. दुकानदाराने आयफोन खरेदी करणाऱ्या व्यक्तीशी मोबाइलवर संपर्क केला साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाइल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच दुकानदाराने या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.