मुंबई : प्रशासकीय कौशल्य आणि सर्जनशील अभिव्यक्ती असा सुरेख मिलाफ जहांगीर आर्ट येथे सुरू असलेल्या ‘व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : ॲब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स’ या चित्रप्रदर्शनातून रसिकांना अनुभवता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी आणि राजनवीर सिंग कपूर यांच्या या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीच्या हिरजी आर्ट गॅलरी दालनात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. २२ जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या अधिकारी असून सध्या त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (एनजीएमए), मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या राजस्थानच्या, मारवाड प्रांतातून असलेल्या निधी चौधरी यांनी निसर्गाप्रती असलेल्या आपल्या संवेदनांची अभिव्यक्ती ‘व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : ॲब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स’ या चित्रप्रदर्शनातून केली आहे. त्यांची चित्रे सेमी-ॲबस्ट्रॅक्ट शैलीतील असून त्यात भारतीय, ग्रीक, इजिप्शियन अशा प्राचीन संस्कृतींमध्ये झाडांना दिले गेलेले महत्त्व अधोरेखित करतानाच आजच्या काळात पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षाकडेही या चित्रांमधून लक्ष वेधले आहे. ‘हे माझ्यासाठी केवळ एक कला प्रदर्शन नाही, तर ही एक जनजागृतीची मोहीम आहे. विविध रंगसंगतींमधून आणि प्रतिकात्मक शैलीतून मी प्रेक्षकांना थोडे थांबून निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याचा नव्याने विचार करायला प्रवृत्त करू इच्छिते,’ अशी भावना निधी चौधरी यांनी व्यक्त केली.
तर राजनवीर सिंग कपूर हे २०१२ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असून सध्या ते पश्चिम बंगाल सरकारच्या सुंदरबन व्यवहार विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. सार्वजनिक जीवनात कलात्मक उपक्रम रुजवण्यासाठी ते ओळखले जातात. पश्चिम बंगाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी कोलकात्याच्या ऐतिहासिक ट्रामचे रूपांतर फिरत्या वाचनालयांमध्ये आणि उपाहारगृहांमध्ये केले होते. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या त्यांच्या ॲक्रेलिक माध्यमातील ॲब्स्ट्रॅक्ट चित्रांमधून त्यांच्या विकसित होत जाणाऱ्या शैलीचे दर्शन घडते.
‘जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन लावणे हे कोणत्याही कलाकारासाठी स्वप्नपूर्तीसारखे असते. कला ही कुठल्याही सीमांमध्ये अडकत नाही, ती संस्कृती आणि भूगोल एकत्र आणू शकते, हे मी या प्रदर्शनातून दाखवू इच्छितो. इथे, ऑस्ट्रेलियन आदिवासी कला एका कोलकात्यातील पंजाबी कलाकाराने नव्या दृष्टिकोनातून मांडली आहे आणि ती आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत सादर होत आहे,’ असे राजनवीर यांनी सांगितले. हे चित्रप्रदर्शन २२ जूनपर्यंत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे.