वाघ्या-मुरळीची पारंपरिक संस्कृती, संगीतमय गोष्ट आणि एका स्त्रीचा संघर्ष रंगवणारा ‘फुला’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

लहान वयातच जिचं खंडोबाशी लग्न लावलं गेलं अशी एक मुलगी, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर ‘फुला’ हा चित्रपट बेतला आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट आकार घेते. एकीकडे एआयसारख्या तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरांचा किती खोल पगडा समाजावर आहे याचा विरोधाभास हा चित्रपट अधोरेखित करतो. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेला वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे सारख्या ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशील दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली आहे, तर राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषाकार कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे यांनी काम पाहिले आहे.

Award Banner

संगीतमय पद्धतीनं मांडलेला संघर्ष या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. नव्या दमाच्या कलावंतांची ही अस्सल कलाकृती १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.