मुंबई : शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असला तरी राज्य सरकारकडून मागील २० वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून यामुळे राज्यातील हजारो बी.पी.एड. व एम.पी.एड. पदवीधर बेरोजगार आहेत. सरकारच्या अनास्थेविरोधात महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली २७ एप्रिल २०२६ पासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
काय आहेत शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या मागण्या
जिल्हा परिषद केंद्र स्तरावरील २ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा शिक्षकांची १०० टक्के जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात याव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये रिक्त होणाऱ्या पदावर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलद्वारे पूर्ण क्षमतेने भरावी, जिल्हा परिषद केंद्रशाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका व नगरपालिका शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच समाजकल्याण विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शारीरिक शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावी, पवित्र पोर्टल टेट २०२५ भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आदी विविध मागण्यांसाठी राज्यातील शारीरिक शिक्षक आंदोलन पुकारणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील हजारो पात्रताधारक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक प्रदुम्न जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे यांनी केले आहे.
शारीरिक शिक्षण शिक्षकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये वाटा
शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी हा अत्यंत आवश्यक असणारा विषय आहे. शारीरिक व मानसिक सुदृढतेच्या माध्यमातून सक्षम समाज निर्मिती, बलशाली राष्ट्रनिर्मितीच्या वाटचालीमध्ये या विषयाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदकाचा पाया रचला जात आहे. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये या विषयाच्या अध्यापनाचे काम करणारे शारीरिक शिक्षण शिक्षकांची मागील २० वर्षांपासून पदभरती करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सरकारचे या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष संदीप मनोरे यांनी दिली.
