मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. क्षयरोगासारख्या आजाराने अनेकांचा मृत्यूही झाला असून मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी. त्याचबरोबर कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत मुंबई महापालिकेला दिले.
मुंबईत ५१ कबुतरखाने असून त्यातील काही कबुतरखाने हे शंभर दीडशे वर्षे जुने आहेत. यातील काही बंद आहेत तर काही सुरू आहेत. दादरमधील कबुतरखान्याचा पुरातन वास्तू जतन श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, हे सर्व कबुतरखाने रहिवासी तसेच मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहेत. त्यामुळे दादर कबुतरखान्यासह मुंबईतील कबुतरखाने बंद करा, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी प्रश्नोतराच्या तासाला केली. त्यावर मंत्री सामंत यांनी उपरोक्त आधेश दिला.
भाजपच्या चित्रा वाघ यांनीही कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. अंधेरी येथील भरडावाडी येथील या कबुतरखान्याबाबत पालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालयाकडे पाठपुरावा केला मात्र तो बंद झाला नाही. कबुतरांना धान्य टाकण्यास बंदी करावी अशी मागणी वाघ यांनी केली.
जनजागृतीवर भर देणार
दादरमधील कबुतरखान्याबद्दल तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने तो दोन वर्षे बंद ठेवला होता. सरकारने या कबुतरखान्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंगची समिती नेमून कबुतरांना खाणे टाकू नये यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला. मात्र बंदी असूनही कबुतरांना धान्य टाकले जाते. त्यामुळे पालिकेने जनजागृतीवर अधिक भर द्यावा, असे सामंत म्हणाले.