शुक्रवारी एकीकडे शिवसेनेचे नेते मंत्रिपदाची शपथ घेत असताना दुसरीकडे शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्यापासून सहा महिने मज्जाव करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली असून मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी ती सादर करण्यात आली. विरोधी पक्षनेत्याला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सत्तेत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी नियम तयार करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेत विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याला प्रतिवादी करण्यात आले आहे.
शुक्रवारी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेता म्हणून दावा केल्यानंतरही सत्तेत सहभागी होण्याचा शिवसेनेचा घोडेबाजार सुरूच होता. या सगळ्या प्रकारामुळे घटनेची आणि लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.