मुंबई : बारामती विमान दुर्घटनेत कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या हवाई सेविका पिंकी माली हिच्या निधनाने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असे असताना शासनाकडून तिच्या कुटुंबाला अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. परिणामी, शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. खासदार अरविंद सावंत यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला याप्रकरणी लक्ष घालून माली कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्या अपघातात अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदिप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, हवाई सेविका पिंकी माली आदी सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. पिंकी माली या प्रशिक्षित हवाई सेविका होत्या.

अपघाताच्या वेळी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य बजावत होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा सेवेशी संबंधित मृत्यू ठरतो. त्यामुळे संबंधित मंत्रालय आणि विमान कंपनीवर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणताही विलंब किंवा संभ्रम न ठेवता तात्काळ भरपाई तसेच सर्व वैधानिक लाभ देण्याची जबाबदारी येते. मात्र प्रत्यक्षात अपघातानंतर कुटुंबीयांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त करून विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठविले.

विमान अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्याची तरतूद अस्तित्वात असतानाही पिंकी माळी यांच्या प्रकरणात प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. यामुळे शासनाच्या कार्यक्षमतेवर आणि संस्थात्मक जबाबदारीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. लागू नियमांनुसार पिंकी माली यांच्या कुटुंबीयांना देय असलेली नुकसानभरपाई व सर्व लाभ तात्काळ द्यावेत, अशी मागणी खासदार सावंत यांनी केली आहे. तसेच संबंधित विमान कंपनी आणि विमा कंपन्यांना स्पष्ट आदेश देऊन सर्व औपचारिक प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दुर्घटना झाल्यापासून मुलींच्या कंपनीकडूनही काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. मुलगी गमावल्याने आमचा मोठा आधार हिरावला आहे. पूर्वी तिच्याकडून घरात थोडीफार आर्थिक मदत होत असे. मात्र, आता अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाने नुकसान भरपाईबाबत काहीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर शासनाने थोडेफार सहाय्य करावे, अशी मागणी पिंकीचे वडील शिवकुमार माली यांनी केली आहे.