मुंबई : बारामती विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हवाई सेविका पिंकी माली (२९) हीचादेखील दुर्दैवी अंत झाला. अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव गुरुवारी वरळीत (माहेरी) आणण्यात आले. त्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत तिला अखेरचा निरोप देण्यात आला. तिला निरोप देण्यासाठी शेकडो नागरिक वरळीत आले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्या अपघातात अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदिप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, हवाई सेविका पिंकी माली आदी सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यातील पिंकी माली हिचे पार्थिव गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास बारामतीहून वरळीत आणण्यात आले. तिच्या मृत्यूबाबत संपूर्ण वरळीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अखेरचा निरोप देण्यासाठी वरळीतील सेंच्युरी मिल म्हाडा कॉलनी परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुलीचे पार्थिव पाहताच तिच्या आईने हंबरडा फोडला. तिला सावरताना पिंकीच्या वडिलांचा देखील कंठ दाटून आला. पिंकीची मोठी बहीण व भावालाही अखेरचा निरोप देणे अवघड झाले होते. ते विदारक दृश्य पाहून आसपासच्या नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नातेवाईक, मित्रमंडळ यांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारादरम्यान पिंकीच्या आईची प्रकृती अचानक ढासळली. त्यांना पूर्वीपासूनच काही आरोग्य समस्या होत्या. त्यात मुलीच्या मृत्यूमुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दुपारी २.३० च्या सुमारास दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत पिंकीचे पती सोमविकर सैनी यांनी तिला मुखाग्नी दिला.

मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या पिंकीने वडिलांच्या आग्रहाखातर हवाई सेविकेची नोकरी स्वीकारली. तिला तिच्या इच्छेने करिअर घडविण्याची मोकळीक दिली असती, तर आज पिंकी जिवंत असती, अशी खंत तिच्या वडिलांनी व्यक्त केली.