भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या पितृपक्ष पंधरवड्यात लोक आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करत असतात. दरम्यान, आज (६ ऑक्टोबर) या पितृपक्ष पंधरवड्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, या दिवशी पवई तलावावर एक चिंताजनक चित्र पाहायला मिळालं आहे. पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करणासाठी आलेल्या लोकांची मोठी गर्दी झाल्याने इथे करोनाप्रतिबंधक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचं दिसून आलं. मास्कचा वापर न करता, शारीरिक अंतर न पाळता कोणत्याही नियमांचं पालन न करता इथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील आणि शहरातील करोनाचा संसर्ग जरी नियंत्रणात आलेला असला तरीही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेला आपण थोपवलेलं असलं तरीही नियमांचं पालन करणं, जबाबदारीने वागणं अनिवार्य आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. सार्वजनिक ठिकाणी हे भान राखणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र, आज पवई तलावावर दिसलेलं चित्र हे निश्चितच चिंताजनक आहे. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी पवई तलाव हा आणखी एका कारणासाठी चर्चेत आला होता.

सायकल ट्रॅकविरोधात भूमिका

पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी पवई तलावाच्या आत होत असलेल्या बेकायदेशीर सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. नवा सायकल ट्रॅक करण्यासाठी पवई तलावामध्ये भराव टाकण्याचं काम सुरू आहे. यामुळे जैवविविधतेला धोका पोहचू शकतो, अशी भूमिका घेत इथे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांकडून प्रतीकात्मक आंदोलनही करण्यात आलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pitru paksh at powai lake crowded no social distancing no mask gst
First published on: 06-10-2021 at 15:19 IST