मुंबई : पितृपक्ष पंधरवड्यात जशी कोणतीही नवीन कामे केली जात नाहीत, तसेच कोणताही नवा चित्रपट किंवा नाटक प्रदर्शित न करण्याचा शिरस्ता गेली अनेक वर्ष चित्रपट निर्माते पाळत आले आहेत. मात्र, दरवर्षी वाढणारी हिंदी आणि विशेषतः मराठी चित्रपटांची संख्या आणि प्रदर्शनासाठी मिळणारा मर्यादित कालावधी यामुळे पितृपक्षाचे भय निर्मात्यांच्या मनातून कधीच निघून गेले आहे. उलट, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव या दोन सणांच्या मध्ये येणारा हा कालावधी चित्रपट प्रदर्शनासाठी अधिक योग्य असल्याचे सांगत अनेक निर्माते या काळात जाणीवपूर्वक चित्रपट प्रदर्शित करतात, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. यंदा अनंत चतुदर्शीला प्रदर्शित होणारे तीन मोठे चित्रपट आणि ऐन पितृपक्ष पंधरवड्यात प्रदर्शित होणारे सात चित्रपट मिळून एकूण दहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

यंदा अनंत चतुदर्शीच्या दिवशी २५ सप्टेंबरला ‘बंडखोर’, ‘तुझ्या आयला’ आणि ‘देवघर ऑन रेंट’ असे तीन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शुक्रवारी सु्ट्टी आणि गणेश विसर्जन मिरवणुकांना होणारी गर्दी असे अवघड समीकरण असतानाही तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘अनंत चतुदर्शी आणि त्यानंतरच्या पंधरवड्यात चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या मराठी चित्रपट निर्मात्यांचा आत्मविश्वास हा निश्चितच सुखावणारा आहे. गेल्या काही महिन्यांत मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग सातत्याने वाढतो आहे, परिणामी, विविध शैलीतील चित्रपट प्रदर्शनाचा टक्काही वाढतो आहे. प्रदर्शक या नात्याने अशा सकारात्मक वातावरणात मराठी चित्रपटांना योग्य अधिकाधिक शोज मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे पीव्हीआर आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक संजीव कुमार बिजली यांनी सांगितले.

पितृपक्ष पंधरवड्यात सात मराठी चित्रपट

येत्या २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पितृपक्ष पंधरवड्यात सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. २ ऑक्टोबरला ‘आली मोठी शहाणी’, ‘गमन’ आणि ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यानंतरच्या आठवड्यात ‘पाच फुटाचा बच्चन’, ‘अफरातफरी’, ‘सहल’ आणि ‘धप्पा’ असे चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीतही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अजय देवगणचा ‘दृश्यम’, ‘प्रेम कीटाणू’ आणि ‘वाल्मिकी रामायण’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अर्थात, हिंदीपेक्षा मराठी चित्रपट प्रदर्शनाची संख्या अधिक असून वैविध्यपूर्ण-दर्जेदार आशयाला मिळणारी प्रेक्षकपसंती ही केवळ मराठी किंवा प्रादेशिक चित्रपटांच्याच नव्हे तर चित्रपटगृहांच्या व्यवसायासाठीही सकारात्मक बाब ठरली असल्याचे संजीव कुमार बिजली यांनी सांगितले.

पितरांचे आशिर्वाद घेऊन प्रदर्शन…

दरवर्षी ८० ते १०० चित्रपट मराठीत प्रदर्शित होतात. वर्षभरातील ५२ आठवड्यांत सणावारांचे दिवस, सुट्ट्यांचे दिवस असे सगळे गणित जमवले तर प्रदर्शनासाठी फक्त ३५ आठवडे निर्मात्यांना मिळतात. त्यातही एखादा मोठा हिंदी, दाक्षिणात्य किंवा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला तर तेही दिवस मर्यादित होतात. मग उरलेल्या प्रत्येक आठवड्यात कमीतकमी तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित करणे गरजेचे होऊन बसते. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक येत नाहीत, म्हणून मधल्या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांत चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतात, असे चित्रपट माध्यम संपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी सांगितले. पितृपक्ष टाळण्यापेक्षा या काळात पितरांचे आशिर्वाद घेऊन चित्रपट प्रदर्शित करण्यावर अधिक जोर दिला जातो आहे, असेही त्यांनी सांगितले.