केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना अचानाक पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने मुंबईच्या ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पियूष गोयल हे आज मुंबईच्या दौऱ्यावर होते त्यांनी एल्फिन्स्टन पुलाच्या कामाची पाहाणीही केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी ते पत्रकार परिषद घेणार होते. संध्याकाळी ६.३० वाजता ही पत्रकार परिषद होणार होती. मात्र त्याआधीच त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आणि त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

एल्फिन्स्टन ब्रिजच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत बोलत असतानाच त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास सुरू झाला आणि त्यांना बैठक अर्ध्यावर सोडून रूग्णालयात दाखल करावे लागले. गोयल यांना बोलतानाही थोडा त्रास होत होता, त्यांचा घसा दुखत होता आणि त्यांच्या पोटात अचानक वेदना होऊ लागल्या म्हणून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वेमंत्र्यांसोबत आम्हीही एल्फिन्स्टन पुलाच्या बांधकामाची पाहणी केल्याचीही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान कामाचा वेग कसा आहे, नेमके काम कुठवर आले? काम वेळेत पूर्ण होईल की नाही याचा आढावा रेल्वेमंत्र्यांनी दुपारच्या वेळी घेतला. दिलेल्या वेळेच्या आधी हा पूल पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे असेही पियूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र यानंतर जेव्हा ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते तेव्हा त्यांना अचानक त्रास होऊ लागला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचीही माहिती समजते आहे.