मुंबई : वृद्धापकाळात आहार बदलून काहीही फायदा होत नाही अशी सामान्य समजूत आता चुकीची ठरत आहे. नव्या संशोधनानुसार, उच्च दर्जाचा वनस्पती-आधारित आहार उशिरा आयुष्यात सुरू केला तरी अल्झायमर व डिमेन्शियाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.ही माहिती अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका मोठ्या अभ्यासातून समोर आली आहे. या संशोधनात सुमारे ९३ हजारांहून अधिक लोकांचा १० ते ११ वर्षे कालावधीत अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी सहभागींच्या आहाराच्या सवयींचे विश्लेषण करून त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले.
अभ्यासानुसार ज्या व्यक्ती नियमितपणे फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि सुका मेवा यांसारखे आरोग्यदायी वनस्पती आधारित पदार्थ खात होते त्यांच्यात डिमेन्शियाचा धोका सुमारे १२ टक्क्यांनी कमी आढळला. याउलट, जास्त साखर, रिफाइंड धान्ये आणि प्रोसेस्ड पदार्थांचा समावेश असलेला ‘अनारोग्यदायी’ प्लांट-बेस्ड आहार घेणाऱ्यांमध्ये हा धोका सुमारे ६ टक्क्यांनी वाढल्याचेही निष्पन्न झाले.या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे आहारातील बदलांचा परिणाम. ज्या व्यक्तींनी कालांतराने आपला आहार अधिक आरोग्यदायी केला, त्यांच्यात डिमेन्शियाचा धोका ११ टक्क्यांनी घटला. मात्र, उलटपक्षी अनारोग्यदायी आहाराकडे वळलेल्या लोकांमध्ये हा धोका तब्बल २५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.
‘वनस्पती-आधारित आहार’ हा शब्द ऐकून कोणताही शाकाहारी आहार आरोग्यदायी ठरतो असे मानणे चुकीचे आहे. आहारातील गुणवत्तेला अधिक महत्त्व आहे. नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेले अन्न जसे की हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स हे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तर प्रोसेस्ड फूड, साखरयुक्त पदार्थ आणि रिफाइंड अन्न यांचा जास्त वापर टाळणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे या अभ्यासातून असेही स्पष्ट झाले की ६० वर्षांनंतरही आहारात सुधारणा केल्यास मेंदूवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘आता उशीर झाला’ असा विचार न करता कोणत्याही वयात आरोग्यदायी सवयी अंगीकारणे फायदेशीर ठरू शकते.
तथापि संशोधकांनी हा अभ्यास निरीक्षणात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आहार आणि अल्झायमर यामधील थेट कारण-परिणाम संबंध निश्चितपणे सांगता येत नाही. व्यायाम, जीवनशैली आणि आनुवंशिक घटक यांचाही या आजारावर परिणाम होतो.दरम्यान, या निष्कर्षामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहाराचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून वृद्धापकाळातही जीवनशैलीत बदल करून डिमेन्शियाचा धोका कमी करण्याची संधी उपलब्ध असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
