मुकेश अंबानींनाही प्लास्टिकबंदीचा फटका !

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आता प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू

(संग्रहित छायाचित्र)

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आता प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. विविध शहरांतील महापालिकांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून पहिल्याच दिवशी राज्यभरात सुमारे ११ लाख रुपये इतका दंड वसूल झाला. या प्लास्टिकबंदीचा थोडाफार त्रास भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबांनींनाही सहन करावा लागतोय.

मुंबईच्या माटुंगामधलं कॅफे म्हैसूर हे इडली,सांबार.चटणीसाठी प्रसिद्ध हॉटेल आहे. मुकेश अंबानीसाठी दररोज इथून इडली,सांबार,चटणी पार्सल जातं. मात्र ,प्लॅस्टिकबंदीमुळे आज त्यांच्या घरूनच स्टीलचे डबे हॉटेलमध्ये आणण्यात आलयाचं हॉटेल मालकाने सांगितलं. तसेच प्लॅस्टिकबंदीमुळे इडली-सांबार पार्सल घेऊन जाणाऱ्यांना रिकाम्या हाती परतावं लागत होतं. दररोज कॅफे म्हैसूरमध्ये पार्सल घेण्यासाठी बरीच गर्दी असते मात्र, शनिवारी ही गर्दी प्लॅस्टिक बंदीमुळे तुरळक होती. एकूणच सर्वसामान्य ते श्रीमंतांना या प्लॅस्टिक बंदीचा फटका बसला.
दुसरीकडे, प्लास्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेने सीलेरीया, स्टार बक्स, मॅकडोनाल्ड आणि फूड हॉल अशा चार ठिकाणी कारवाई केली. यापैकी मॅकडोनाल्डने दंड भरला नसून इतर तिघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मॅकडोनाल्डवर खटला भरण्यात येईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

सामान्य माणसांवर कारवाई न करण्याचा आदेश पर्यावरणमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जात असले, तरी पहिल्याच दिवशी प्लास्टिक बाळगणाऱ्या सर्वसामान्य माणसांनाही पाच हजार रुपयांची दंडाची पावती फाडावी लागली. पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूरमध्ये लाखांच्या घरात दंडवसूली झाली. ठाण्यात ९५ हजार तर मुंबईत १५ हजार रुपये दंड वसूल झाला. बंदीमुळे मुंबईतला हॉटेल व्यवसाय २० टक्क्य़ांनी घसरला असून राज्याच्या अनेक भागांत पालिका अधिकारी आणि व्यापाऱ्यांत शाब्दिक खडाजंगी झाली. सोलापुरात पोलिसांना पाचारण करावे लागले. अनेक दुकानदारांनी दुकानेच बंद ठेवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Plastic ban impact on ambani family